Ajit Pawar Death : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने स्वर्गीय अजित पवार यांच्या अस्थींच्या विसर्जनासाठी देशव्यापी कलश यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रे आणि पवित्र नद्यांमध्ये अस्थी-कलश विसर्जन करून दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे.
देशव्यापी कलश यात्रा...
या यात्रेत हरिद्वार येथील हर की पौडी, प्रयागराजचा पवित्र संगम, वाराणसीचा मणिकर्णिका घाट यांसह गया, झारखंड, पश्चिम बंगाल, केरळ, पंजाब, काश्मीर आदी राज्यांमध्येही कलश विसर्जन कार्यक्रम होणार आहेत. ही यात्रा देशाच्या चारही दिशांना ४ ते ७ फेब्रुवारी दरम्यान १४ हून अधिक राज्यांतून प्रवास करणार आहे. या देशव्यापी कलश यात्रेचे नेतृत्व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा करणार आहेत. आज बारामती येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या परिवाराच्या उपस्थितीत अस्थिकलश धीरज शर्मा यांच्याकडे आदरपूर्वक सुपूर्द करण्यात आलं.
शरद पवार देखील अस्थी कार्यक्रमात सहभागी
तिसऱ्या दिवशी (३० जानेवारी) अजितदादांच्या अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर पार पडला. अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांनी धार्मिक विधींनुसार अजित पवारांच्या अस्थी संकलित केलं. शरद पवार देखील अस्थी कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत अजित दादांचे थोरले बंधू श्रीनिवास पवार, चुलत भाऊ राजेंद्र पवार, रणजित पवार, आमदार रोहित पवार आणि संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलं होतं. अस्थी सावडण्याचा विधी सुरू असतानाच शरद पवारही उपस्थित होते. यावेळी पार्थ पवारांनी शरद पवारांना हाक मारून थांबायला सांगितलं. पार्थ पवार अस्थी सोबत घेऊन चौथऱ्यावरून खाली उतरले आणि शरद पवारांनी थरथरत्या हातांनी अस्थी सावडण्याचा विधी केला. आज सकाळी अजित पवारांच्या अस्थी पाच मंगल कलशांमध्ये एकत्रित करण्यात आल्या. यापैकी एक कलश अजितदादांच्या मूळ गावी काटेवाडी येथील घरी ठेवण्यात आला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world