जाहिरात
Story ProgressBack

ताई, माई अक्का मतदानाला चला! महिलांची टक्केवारी वाढवण्यासाठी विशेष मोहीम

Pune Lok Sabha : पुणे जिल्ह्यातील मतदानामध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे.

Read Time: 2 min
ताई, माई अक्का मतदानाला चला! महिलांची टक्केवारी वाढवण्यासाठी विशेष मोहीम
प्रतिकात्मक फोटो
पुणे:

पुणे जिल्ह्यातील मतदानामध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. मागील निवडणुकांमध्ये जिल्ह्यातील कमी मतदान झालेल्या मतदान केंद्रावरील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी ही मोहीम राबवण्यात येणार आहे. त्यानुसार 7 मे रोजी बारामती, 13 मे रोजी पुणे, मावळ आणि शिरूर मतदारसंघात हे अभियान राबवले जाईल. त्यामध्ये सर्व वयोगटातील महिलांनी अधिकाधिक मतदान करावे यासाठी   'ताई, वहिनी, मावशी, आजी मतदानाला चला'  हा अभिनव उपक्रम राबवण्यात येणार आहे. पुणे जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी याबाबतचे निर्देश दिले आहेत.

कशी असेल मोहीम?

जिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे जिल्हा परिषद, पिंपरी चिंचवड व पुणे महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.  आगामी लोकसभा निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यापासून मतदान जनजागृतीसाठी स्वीप कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे

'ताई, वहिनी, मावशी, आजी मतदानाला चला' या उपक्रमांतर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी, पुणे मनपाचे आरोग्य प्रमुख, पिंपरी चिंचवड तसेच उपआयुक्त समाज कल्याण विभाग यांच्याअंतर्गत काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती, बचत गटातील महिला, समूह संघटिका यांचे गट तयार करुन मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देणार आहेत. 

महिला मतदारांचा मतदानात कमी सहभाग असलेल्या केंद्राची माहिती घेण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्यात येईल. जिल्ह्यातील 4 हजार 900 पेक्षा जास्त मतदान केंद्र परिसरात ही मोहीम राबविण्याचे नियोजन आहे. महिलांना मतदान करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी जिल्ह्यात 21 महिला संचालित मतदान केंद्र असणार आहेत. मतदान केंद्रांवर महिलांसाठी स्वतंत्र रांग, पाळणाघर, पाळणाघरात अंगणवाडी सेविका, स्वतंत्र स्वच्छतागृह आदी आवश्यक मूलभूत सुविधादेखील असतील.

भन्नाट ऑफर! मतदान करा... बोटाची शाई दाखवा... मोफत केस कापा...
 

हा उपक्रम राबविताना घरोघरी भेटीदरम्यान महिला, वृद्ध, दिव्यांगांना मतदानाचे महत्त्व सांगण्यात येईल.  निवडणूक आयोगाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्याच्या आणि मतदान सुलभ व समावेशक व्हावे यासाठी मतदानाच्या ठिकाणी देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती देण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.

Voter ID नसेल तरी टेन्शन नाही, तुम्हाला करता येईल मतदान!

नेमून दिलेल्या भागातील कोणतीही वस्ती, नागरिक दुर्लक्षित राहणार नाहीत याची काळजी घ्यावी, घरभेटी दरम्यान मतदारांशी नम्रता व सौजन्यपूर्वक संवाद साधावा,  आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत, अशी माहिती स्वीप समन्वयक अर्चना तांबे यांनी दिली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination