'जादूची कांडी फिरवणार आहे का?', मविआच्या 'पंचसूत्री'ची अजित पवारांनी उडवली खिल्ली; म्हणाले...

महाविकास आघाडीने राज्यातील महिलांना दर महिना ३००० तर बेरोजगार तरुणांना ४००० रुपये देण्याची मोठी घोषणा केली. या जाहीरनाम्याची आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खिल्ली उडवली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

रेवती हिंगवे, प्रतिनिधी: 

महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारसभांचा धडाका सुरु आहे. निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या घोषणा आणि आश्वासनांची खैरात सुरु आहे. अशातच महाविकास आघाडीने राज्यातील महिलांना दर महिना ३००० तर बेरोजगार तरुणांना ४००० रुपये देण्याची मोठी घोषणा केली. या जाहीरनाम्याची आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खिल्ली उडवली आहे. पटेल असे तरी बोला, असा टोला त्यांनी मविआच्या नेत्यांना लगावला आहे. पुण्यामध्ये वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीसाठी गेले असता ते माध्यमांशी बोलत होते. 

काय म्हणाले अजित पवार? 

'आम्ही दोघे हिशोब करत होतो की बेरोजगारांना 4 हजार देणार, शेतकऱ्यांंना ३ लाखा पर्यंतची कर्जमाफी देणार, महिलांना 3 हजार देणार. या सगळ्याला साधारणपणे 3 लाख कोटी रुपये लागतील. आपलं बजेट आहे साडेसहा लाख कोटींचे, पुढच्यावेळीस अंदाजे होईल 7 लाख कोटींचे. पगार, पेन्शन, घेतलेल्या कर्जाचे व्याज यात निम्मे पैसे जातात. निम्मे गेल्यावर निम्मे या योजनांना राहतात. मग विकासासाठी पैसे कुठून आणणार? केंद्र सरकार यांच्या विचाराचे नाही त्यामुळे तिथून यांना फार निधी मिळतील अशातला भाग नाही, पटेल असे तर बोला..', असा टोला अजित पवार यांनी लगावला. 

नक्की वाचा: लातूरमध्ये विलासरावांच्या मुलासमोर भाजपाचं तगडं आव्हान, थेट लढतीचा निकाल काय लागणार?

जादूची कांडी फिरवणार आहे का?

तसेच "आमच्या सरकारवर टीका करतात. आम्ही या सगळ्या योजना 75 हजार कोटींपर्यंत घेऊन गेलो होतो. आता ते देत असलेली योजनांची आश्वासने पाहता रक्कम 3 लाख कोटींपर्यंत जात आहे. तुम्ही आम्हाला म्हणत होता की देऊ शकत नाही, आणि तुम्ही दुप्पट तिप्पट चौपट वाढ करत आहात. हे कसं शक्य आहे? जादूची कांडी फिरवणार आहे का?" असा खोचक सवालही अजित पवार यांनी यावेळी उपस्थित केला. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा, पाऊण तास चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

ट्रेडिंग बातमी: मनसेला मोठा धक्का! मुंबईतील बड्या नेत्याने शिवबंधन बांधलं; ठाकरेंच्या भाच्याला विजयी करण्याचा विडाही उचलला