मुंबई: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी झाल्यानंतर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जोर- बैठका सुरु आहेत. याबाबत आता महत्त्वाची अपडेट समोर आली असून अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागला आहे.
राज्यामध्ये महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर सोमवारपासून (16, डिसेंबर) राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. त्याआधी अधिवेशनाच्या पुर्वसंधेला म्हणजेच रविवारी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. काल रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जवळपास 40 मिनिटे चर्चा झाली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या बैठकीत रविवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून भावी मंत्र्यांना शपशविधी सोहळ्याचे आमंत्रण दिले जाणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला जवळपास 35 मंत्री शपथ घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांमध्ये झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या खात्या संदर्भात चर्चा झाली. शिवसेनेच्या मंत्र्यांच्या नावाची यादी जवळपास निश्चित झाली असून उद्या शिंदेंकडूंन नावे जाहीर होण्याची शक्यता आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांची यादी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिली आहे. शिंदेसेनेच्या मंत्र्यांची यादी उशीरा दिल्याने नागपूरला शपथविधी घेण्याची वेळ आल्याचे सांगण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांना नगरविकास यासह उद्योग खात्याचा आग्रह तसंच काही अन्य खाते हवीत पण भाजपा यंदा उद्योग खाते घेण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी शिवसेना कोट्यातील मंत्र्यांची नाव दिल्यानंतर महायुतीची अंतिम यादी दिल्ली दरबारी जाणार आहे. आज सकाळी महायुती अंतिम यादी दिल्लीतून अंतिम मंजुरीनंतर दुपारनंतर मंत्री पदावर वर्णी लागणाऱ्यांना फोन केले जाणार आहेत.
भाजपचे संभाव्य मंत्री: राधाकृष्ण विखे पाटील, रविंद्र चव्हाण, अतुल सावे, संजय कुटे, आशीष शेलार, योगेश सागर, राहुल अहीर, राहुल कुल,सचिन कल्याणशेट्टी, नितेश राणे, समीर कुनवार, रवी राणा
शिवसेना शिंदे गटाचे संभाव्य मंत्री: शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांमध्ये उदय सामंत, शंभूराजे देसाई, गुलाबराव पाटील दादा भुसे, प्रताप सरनाईक, आशिष जयस्वाल, योगेश कदम, विजय शिवतारे
( नक्की वाचा : '.... आणि रणजीतसिंह मोहिते पाटलांना राणेंनी हाकलून लावले', गोपीचंद पडाळकर यांचा गौप्यस्फोट )