Ajit Pawar Death: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले आहे. त्यांच्या अकाली झालेल्या निधनामुळे संपूर्ण देशाला मोठा धक्का बसलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजित पवार यांच्यासाठी सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर केलीय.
राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये नेमके काय म्हटलंय, जाणून घेऊया सविस्तर...
माझे मित्र आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. महाराष्ट्राच्या राजकारणाने एक उमदा नेता गमावला.अजित पवार यांचा आणि माझा राजकारणातला प्रवेश हा काहीसा एकाच काळातील, अर्थात आमचा परिचय हा बराच नंतरचा. पण राजकारणावर कमालीचं प्रेम या एका गुणावर अजित पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठी झेप घेतली. अजित पवार हे पवार साहेबांच्या मुशीत जरी तयार झालेले नेते असले, तरी त्यांनी नंतर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आणि ही ओळख महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ठसवली.
१९९० च्या दशकांत महाराष्ट्रात शहरीकरणाने वेग पकडला. ग्रामीण भाग अर्धशहरीपणाकडे झुकू लागला, तरी तिथल्या राजकारणाचा बाज हा ग्रामीणच होता, जरी तिथल्या प्रश्नांचं स्वरूप हे काहीसं शहरी होत चाललं असलं तरी. या पद्धतीच्या राजकारणाचा पूर्ण अंदाज आणि ते उत्तम पद्धतीने कसं हाताळायचं याचं कसब अजित पवारांकडे होतं. पिंपरी चिंचवड आणि बारामती ही त्याची दोन उत्तम उदाहरणं. पिंपरी चिंचवड असेल की बारामती असेल अजित दादांनी या भागांचा कायापालट केला हे त्यांचे राजकीय विरोधक पण मान्य करतील.
प्रशासनावर अचूक पकड आणि एखाद्या फाईलीचा गुंता सोडवताना त्याची गाठ नक्की कुठून सोडवायची याचं अचूक ज्ञान असलेला हा नेता होता. प्रशासन हे सत्ताधाऱ्यांच्या पेक्षा वरचढ होण्याच्या काळात असा नेता महाराष्ट्राने गमावणं हे अतिशय दुर्दैवी आहे.
अजित पवार हे कमालीचे स्पष्टवक्ते होते. काम होणार नसेल तर ते तोंडावर सांगायचं आणि होणार असेल तर त्यासाठी ते सगळी शक्ती लावायचे. आश्वासनं देऊन स्वतः भोवती माणसांचा पिंगा घालायचा हा त्यांचा स्वभाव नव्हता. राजकारणात सडेतोडपणाची आणि स्पष्टवक्तेपणाची किंमत मोजावी लागते, त्याचा अनुभव मला पण आहे आणि त्यामुळे ती अजित पवारांना पण किती मोजायला लागली असेल याचा अंदाज करता येतो. अजित पवारांच मला आवडणारं अजून एक वैशिट्य म्हणजे ते अजिबात जातीय नव्हते आणि त्यांच्या राजकरणात जातीपातीला अजिबात स्थान नव्हतं. सध्याच्या राजकारणात जातपात न मानता राजकारण करण्याचं धारिष्ट्य दाखवणारेच नेते कमी उरलेत, त्यात अजित पवार हे अग्रणी होते हे नक्की.
राजकारणातला विरोध हा राजकीय असतो, तो व्यक्तिगत नसतो. त्यामुळे एकमेकांवरची जहरी टीका ही व्यक्तिगत घ्यायची नसते, हे भान असलेले नेते महाराष्ट्रात कमी होत चालले आहेत. राजकारणातले दिलदार विरोधक एका मागे एक जाणे हे महाराष्ट्राच्या उमद्या राजकारणाचं मोठं नुकसान आहे.
मी आणि माझं कुटुंबीय पवार कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अजित पवारांना भावपुर्ण श्रद्धांजली.
राज ठाकरे ।
माझे मित्र आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. महाराष्ट्राच्या राजकारणाने एक उमदा नेता गमावला.
— Raj Thackeray (@RajThackeray) January 28, 2026
अजित पवार यांचा आणि माझा राजकारणातला प्रवेश हा काहीसा एकाच काळातील, अर्थात आमचा परिचय हा बराच नंतरचा. पण राजकारणावर कमालीचं प्रेम या एका गुणावर अजित पवारांनी… pic.twitter.com/yIjUC255Af
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world