निवडणुकांमध्ये रक्ताची नाती एकमेकांची प्रतिस्पर्धी झाल्याची अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. रत्नागिरीमध्ये याच्या उलट प्रकार घडलाय. आपल्या मुलीची आणि आपल्या पक्षाची अडचण होऊ नये यासाठी राजेश सावंत यांनी कठोर निर्णय घेतला आहे. दक्षिण रत्नागिरी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे त्यानी आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे अथवा नाही, याबद्दलची माहिती मिळू शकलेली नाही .
नक्की वाचा: शहराच्या विकासाची चर्चा शॉपिंग कॉम्पेक्समध्ये होणार? अहमदपूर नगरपरिषद चर्चेत का?
शिवानी सावंत-माने यांच्यासाठी राजेश सावंत यांनी घेतला मोठा निर्णय
शिवानी सावंत-माने ही रत्नागिरी भाजपचे नेते राजेश सावंत यांची कन्या आहे. माजी आमदार बाळ माने यांच्या मुलाशी शिवानी सावंत यांचा विवाह झाला आहे. बाळ माने यांनी 2024 साली भाजपची साथ सोडून ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवानी सावंत-माने यांनी देखील सासऱ्यांप्रमाणेच ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. राजेश सावंत यांनी आपल्या भूमिकेबद्दल स्पष्टीकरण देताना सांगितले की, "8 दिवसांपूर्वी शिवानी सावंत-माने हिने ठाकरे गटाकडून उमेदवारी मागितली. ती दुसऱ्या पक्षाकडून उमेदवारी मागत असेल तर आपण भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना अडचणी निर्माण होऊ शकतात. उद्या युतीच्या बैठका होणार असतील तर त्यात मी उपस्थित राहणे हे मला योग्य वाटत नाही. नैतिकतेला धरून मी हा राजीनामा दिला आहे." राजेश सावंत यांनी पुढे बोलताना म्हटले की, पक्षाने माझ्याकडे राजीनामा कधीही मागितला नव्हता आणि पक्षाने माझ्यावर कायम विश्वास दाखवला आहे, अविश्वास निर्माण होणारी गोष्ट माझ्या हातून घडू नये असे मला वाटते त्यामुळे मी राजीनामा दिला."
नक्की वाचा: बहीण भावाच्या लढतीनंतर आता पाचोऱ्यात नणंद भावजय लढत! राजकीय वैरामुळे नेत्यांचा ताप वाढला
माझे वडील माझ्यासाठी काहीही करू शकतात, शिवानी माने झाल्या भावूक
नगराध्यक्षपदाच्या संभाव्य उमेदवार शिवानी सावंत-माने यांना वडिलांच्या राजीनामा देण्याच्या निर्णयाबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या की, "माझ्या वडिलांनी राजीनामा दिला ते माझ्यासाठी काहीही करू शकतात." शिवानी यांनी पुढे म्हटले की, "माझे आजोबा शिवसेनेचे आमदार होते, मला राजकीय वारसा आहेच, त्यामुळे रत्नागिरीकरांनी मला संधी द्यावी," राजीनामा दिल्याच्या घटनेसंदर्भात आपले वडिलांशी बोलणे झाले शिवानी यांनी म्हटले आहे, परंतु त्यांचे वडील पक्षाशी एकनिष्ठ आहेत हे त्यांनी दाखवून दिले आहे, असे त्या म्हणाल्या.