
संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून, भारतीय हवामान खात्याने अनेक जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मुंबई, रायगड, पुणे घाट, सातारा घाट, रत्नागिरी आणि कोल्हापूर घाट या भागांसाठी 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे. याशिवाय पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांनाही 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे.
नक्की वाचा: 19 ऑगस्ट रोजी शाळा कॉलेजना सुट्टी मिळणार? उद्याही मुसळधार पावसाचा अंदाज
अतिमुसळधार पावसाचा इशारा
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील 24 ते 48 तासांत या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने सर्व संबंधित जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे. विशेषतः रेड अलर्ट जारी केलेल्या भागांमध्ये नागरिकांना अनावश्यक घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
नक्की वाचा: छत्रपती संभाजीनगरमध्ये तुफान पाऊस, हजारो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली; शेतकरी रडकुंडीला!
भरतीमुळे उंच लाटा उसळणार
पावसाच्या जोडीलाच समुद्रातही मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (INCOIS) ने दिलेल्या इशाऱ्यानुसार, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये 18 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 11:30 पासून ते 20 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 8:30 पर्यंत 3.5 ते 4.3 मीटर उंचीच्या लाटा उसळू शकतात.
मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला
पालघर, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये 19 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 8:30 पासून ते 20 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 8:30 पर्यंत 3.5 ते 4.2 मीटर उंचीच्या लाटा येण्याची शक्यता आहे. या काळात समुद्राची स्थिती अत्यंत खवळलेली असेल आणि ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे, सर्व मच्छिमारांना पुढील सूचना मिळेपर्यंत समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
जगबुडीने धोक्याची पातळी ओलांडली
रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी, शास्त्री, कोदवली या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे तसेच रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली असून जिल्हा प्रशासना मार्फत सतर्क राहण्याची सूचना देण्यात आली आहे. NDRF चे 1 पथक बीड तालुका परळी कौडगाव येथे शोध व बचाव कार्यासाठी नियुक्त करण्याच्या अनुषंगाने रवाना करण्यात आले आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे 1 पथक नांदेड तालुका मुखेड हळणी गाव येथे नियुक्त केले असून त्या परिसरात कार्यरत आहे.
IMD, NRSC या केंद्रीय संस्था सोबत सतत संपर्क साधून पुढील हवामानाच्या अंदाजाची माहिती घेऊन सर्व जिल्ह्यांना प्रसारित करण्यात येत आहे. तसेच SACHET platform चा वापर करून हवामानाचे अलर्ट नागरिकांपर्यंत SMS /NOTIFICATION च्या माध्यमातून पोहचवण्यात येत असल्याचेही राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world