
मान्सूनच्या एन्ट्रीमुळे आल्हाददायक वातावरण निर्माण झालं असलं तरी काल 26 मे रोजी उद्भवणाऱ्या अनेक अडचणींमुळे नागरिकांचं टेन्शन वाढलं आहे. काल 26 मे रोजी मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट दिला होता. पुढील काही दिवस या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस गेल्या 2-3 दिवसांपासून होत आहे. इतके दिवस अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली तर आहेच पण शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान पण झाले आहे.
दरम्यान आज आयएमडीकडून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली या भागातील काही भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आज मुंबई, ठाणे, सातारा आणि रायगडला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
नक्की वाचा - Maharashtra Rain : सोलापुरकरांसाठी चांगली बातमी! जून उजाडण्यापूर्वीच उजनी धरण होणार फुल्ल
पुणे जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट
अहिल्यानगर, कोल्हापूर, मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, परभणी, पुणे , सांगली, सातारा, ठाणे या जिल्ह्यात पुढील 3 तासांत जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह ताशी ४०-५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे असा इशारा वेधशाळेने दिला आहे.
पुण्यासह राज्यभरात मुसळधार पावसाची नोंद आहे. अनेक ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे तर पुढच्या दोन ते दिवसासाठी राज्यात कोकणासह मुंबईत ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर पुण्यातील घाटमाथा परिसरात ऑरेंज अलर्ट आहे आणि पुणे शहरात येलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. दरवर्षी पेक्षा या वर्षी मॉन्सून हा लवकर दाखल झाला आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात मागील दोन दिवसात 130 मिमी इतका पाऊस नोंदवण्यात आला आहे. पुढील 3 ते 4 दिवस असंच काहीस वातावरण राहण्याचा अंदाज असल्याने त्यानुसार शेतकऱ्यांनी पेरणी करावी.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world