Maharashtra Rain Update: जून महिना अर्धा संपत आला तरी पावसाची चिन्हे दिसत नसल्याने टेन्शन चांगलेच वाढले आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनच्या एन्ट्रीची प्रतिक्षा आहे. मुंबईमध्ये उन्हाने अंगाची लाही लाही होत असून उन्हाच्या कडाक्याने हैराण झालेले नागरिक पावसाच्या तडाख्याची वाट पाहत आहेत. मात्र मान्सूनच्या वाटेत अल निनोने अडथळा आणल्याने त्याचा प्रवास आणखी लांबण्याची शक्यता आहे.
मान्सूनच्या वाटेत अल निनोचा अडथळा
मान्सूनच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या सर्वसामान्यांसाठी आणि शेतकऱ्यांसाठीही एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. अल निनोच्या अडथळ्यामुळे मान्सून मुंबईपर्यंत उशिरा पोहोचणार असल्याचं दिसत आहे. मान्सून चार दिवसांपासून सुमारे दीडशे किलोमीटर अंतरावर रत्नागिरीमधल्या हर्णेमध्येच अडकला आहे.. त्यासाठी अल-निनो जबाबदार असल्याचं वैज्ञानिकांनी म्हटले आहे.
अल-निनो मुळे हिंदी महासागर आणि अरबी समुद्रातील आर्द्र वारे देशाकडे ओढले जात नाहीत. त्यामुळे मान्सून कमकुवत होतो. महाराष्ट्रात अजूनही अनेक भागांमध्ये मान्सून पोहोचलेला नाही. 20 जूननंतरच पोहोचण्याची चिन्हं दिसत आहेत. तोपर्यंत उष्णतेची लाट आणि मान्सून पूर्व पाऊस असं वातावरण राहणार आहे. मुंबईत पुढचे दोन दिवस प्रचंड उकाडा सहन करावा लागणार आहे.
विदर्भात अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे. जून आणि जुलैमध्ये एल निनोमुळे मान्सूनचा पाऊस कमी राहण्याचा अंदाज आहे. तर उष्णता वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जूनमध्ये पावसात 26 टक्क्यांची तूट नोंदवली गेली आहे. अल निनोच्या प्रभावामुळे पावसात आणखी घट होऊ शकते.
दरम्यान, पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिले आहे. मृग नक्षत्र सुरु होऊनही पावसाच्या सरी कोसळल्या नसल्याने पेरण्यांवर मोठा परिणाम झाला आहे. पाऊस पडत नसल्याने खरीप हंगामातील पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. मे महिन्याच्या अखेरपर्यंत शेतीच्या मशागतीची सर्व कामे उरकून बळीराजा पेरणी करण्याची वाट पाहत आहे. मात्र अद्यापही पाऊस पडत नसल्याने बळीराजाची चिंता चांगलीच वाढली आहे.
( नक्की वाचा : Badlapur News: 48 वार करून महिलेचा खून, नंतर स्वतःवर केले 8 वार; बदलापुरातील घटनेने सर्वच सून्न, वाचा सविस्तर )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world