
धुळे: 1 मे ते 14 मे या काळात अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यामुळे राज्यात 21 जिल्ह्यातील 22 हजार 233 हेक्टर क्षेत्रावरील शेतीपिकाचे नुकसान झाले असून कांदा, आंबा, भात, बाजरी, मका, डाळिंब, संत्री यांसह भाजीपाला आणि फळबागांना फटका बसलाय. अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक 10, 636 हेक्टरवरील पिके बाधित झाली, त्याखालोखाल जळगावमध्ये 4,396 हेक्टर वरील पिकांना अवकाळीचा तडाखा बसला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कांद्याचे दर घसरले
संपूर्ण राज्यभरात होत असलेल्या अवकाळी पावसाचा फटका हा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बसला असून उन्हाळी कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत एकीकडे मोठ्या प्रमाणावर उन्हाळी कांद्याची आवक होत असताना दुसरीकडे मात्र भाव चांगलेच घसरल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
अवकाळी पाऊस होण्यापूर्वी पंधराशे रुपये क्विंटल असलेला कांदा अवघ्या सहाशे रुपये क्विंटल विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून यामुळे लागवडीचा खर्च देखील निघणार नसल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तसेच अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने उन्हाळी कांद्याला किमान हजार रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
नक्की वाचा: तुरुंगातल्या आरोपीने सुचवले संजय राऊत यांच्या 'नरकातला स्वर्ग' पुस्तकाचे नाव
जळगावमध्ये अवकाळीचा कहर...
जळगाव जिल्ह्यात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा अनेक भागात वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली असून चोपडा व भुसावळ तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या आठवड्याभरात जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती मात्र दोन दिवसानंतर पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे तापमानातही मोठी घट झाली आहे. आधीच अवकाळी पावसामुळे केळी व रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्यातच पुन्हा आता वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world