सागर कुलकर्णी, मुंबई: विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर महायुतीमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. 5 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता आझाद मैदानावर नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. त्याआधी महायुतीमध्ये मंत्रिपदाच्या वाटपासंदर्भात महत्वाची बैठक पार पडणार असून त्याचा फॉर्म्युलाही आता समोर आला आहे.
राज्याचे दोन दिवसांपासून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती ठीक नसल्याने ते दोन दिवस साताऱ्याला मुक्कामी होते. सातारा दौऱ्यावरुन एकनाथ शिंदे पुन्हा मुंबईत दाखल झाले असून आता सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सत्ता वाटपाचा फॉर्म्युला अंतिम केला जाणार आहे. एकनाथ शिंदे, माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या एकत्रित बैठकीत हा फॉर्म्युला ठरवला जाणार आहे.
नक्की वाचा: सस्पेन्स संपला! CM पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव फायनल; पीटीआयची माहिती
यामध्ये भाजपला 21 ते 22 मंत्रिपदे, शिवसेनेला 10 ते 12 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 9 ते 11 मंत्रिपदे मिळणार असल्याची महत्वाची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. यामध्ये काही महत्वाच्या खात्यांवरुन एकनाथ शिंदे आणि अजित पवारांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रीपदावर दावा केला आहे. यासह नगरविकास, सार्वजनिक आरोग्य, उद्योग, परिवहन, उत्पादन शुल्क, सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) ग्रामविकास खात्यासाठीही ते आग्रही आहेत.
त्याचबरोबर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला वित्त खात्यासह सहकार, अन्न व नागरी पुरवठा, वैद्यकीय शिक्षण, सामाजिक न्याय, महिला व बालविकास, कृषी आदी खाती मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे भाजप गृह मंत्रालय तसंच विधानसभा अध्यक्ष पदासाठी आग्रही राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
एकनाथ शिंदेंच्या विधानसभेऐवजी विधान परिषद सभापती किंवा उपसभापती पद देण्याची शक्यता असून विधानसभा उपाध्यक्ष राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे. तसेच विधान परिषदेचे उपसभापतीपद भाजपा घेण्याची शक्यता आहे. यांपैकी कोणाला किती अन् कोणती खाती मिळणार? गृहमंत्री पदावर अडून बसलेल्या एकनाथ शिंदे यांची समजूत कशी काढणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world