![Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांच्या मेहुण्याविरोधात तडीपारीची कारवाई, काय आहे प्रकरण? Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांच्या मेहुण्याविरोधात तडीपारीची कारवाई, काय आहे प्रकरण?](https://c.ndtvimg.com/2025-02/nrv9inu_manoj-jarange-_625x300_09_February_25.jpg?im=FitAndFill,algorithm=dnn,width=773,height=435)
Manoj Jarange Patil : जालना जिल्ह्यातील अंबड आणि घनसावंगी परिसरातील वाळू माफिया आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 9 जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. जालन्यासह बीड, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या 3 जिल्ह्यातून तडीपारीची नोटीस काढण्यात आली आहे. यामध्ये मराठा आरक्षण आंदोलकर्ते मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडकर याच्यासह 6 कार्यकर्त्यांविरोधातही तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. अंबड उपविभागीय न्याय दंडाधिकारी आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या आरोपींविरोधात जालन्यातील अंबड, घनसावंगी आणि गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती आहे. या सर्व नऊ जणांवर 2019 पासून वेगवेगळ्या प्रकरणात गुन्हे दाखल आहेत. यात मनोज जरांगे यांच्या आरक्षण आंदोलनामध्ये सक्रिय असणाऱ्या जवळपास सहा जणांचा समावेश आहे. या नऊ जणांना परभणी, जालना, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून हद्दपारची कारवाई करण्यात आली आहे. या नऊ जणांवर वाळू चोरी, जीवे मारण्याचा प्रयत्न, अंतरवाली सराटीच्या आंदोलनातील जाळपोळ आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचे गुन्हे दाखल आहेत.
नक्की वाचा - Aarushi Pokhriyal Nishank : बॉलिवूड प्रेम पडलं महागात; माजी मुख्यमंत्र्यांच्या देखण्या मुलीला 4 कोटींचा चुना
यात मनोज जरांगे यांचा मेहुणा विलास खेडकर याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. 2021 मध्ये ट्रॅक्टरद्वारे अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी त्याच्यावर हा गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. खेडकर याच्यावर 2023 मध्ये जालन्यातील शहागड इथे बस जाळल्याप्रकरणी 307, 353 आणि 435 या कलमान्वये गुन्हा दाखल आहे. 2023 मध्ये गोदावरी नदीतून 4 लाख 81 हजार रुपयांची 100 ब्रास वाळू चोरी प्रकरणात गुन्हा आहे. 2023 मध्ये पाथरवाला बुद्रुक येथे गोदावरीमधून केणीच्या साह्याने 500 ब्रास वाळू चोरी केल्याप्रकरणी देखील गोंदी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडकर याला जालना, छत्रपती संभाजीनगर आणि परभणी या तीन जिल्ह्यातून उपविभागीय न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशाने तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. जरांगे पाटील यांचं आंदोलन स्थगित होताच जालना जिल्हा प्रशासनाच्यावतीने कारवाई सुरू करण्यात आल्याने अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world