
Manoj Jarange : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे आणि 'सगे सोयरे' शब्दाची अंमलबजावणी करावी, या मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलन सुरु केलं आहे. यासाठी जरांगे आज मराठा बांधवांसह मुंबईकडे कूच करणार आहे. त्याआधी त्यांनी मराठा बांधवांना शांततेचे आवाहन करत, सरकार आणि काही राजकीय नेत्यांवर गंभीर आरोप केले.
मराठा बांधवांना शांततेचे आवाहन
जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला त्यांच्या हक्कासाठी शांततेत मुंबईकडे जाण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, "आपल्या न्यायासाठी आपल्याला मुंबईत शांततेत जायचं आहे. शांततेचा संघर्ष सुरु ठेवायचा आहे. आपल्यासाठी आणि आपल्या लेकरांसाठी न्याय महत्त्वाचा आहे. सगळ्यांनी समाजाची मान खाली होईल असं वागायचं नाही." प्रेस कॉन्फरन्स संपल्यावर लगेचच मुंबईच्या दिशेने निघणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जरांगे पाटील यांनी आपल्या आंदोलकांना सावध राहण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की, "आपल्याला उचकवण्याचा आणि अडकवण्याचा प्रयत्न केला जाईल. आपण काळजी घ्यायची आहे. घाई गडबड करून नका. जितके दिवस लागतील लागू द्या, संयम ढळू द्यायचा नाही. त्यांनी ही लढाई डोक्याने जिंकायची आहे. जगाच्या पाठीवर कधी झाली असेल अशी लढाई लढायची आहे, कितीही दिवस लागले तरी चालेल, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं.
जरांगे पाटील यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, "हिंदूंना अडवणारे तुम्ही कोण? तुम्ही हिंदू विरोधी काम का करता याचं उत्तर आम्हाला हवं. राज्यात जाणूनबुजून मुख्यमंत्री आम्हाला त्रास का देत आहेत?" त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनाही प्रश्न विचारला की, हिंदूंच्या नावाखाली आमची अडवणूक का केली जात आहे?
देव-देवतांच्या नावाखाली अडवणूक
गणेशोत्सव जवळ असतानाच मोर्चा काढल्याने त्यावर होत असलेल्या टीकेवर जरांगे पाटील यांनी आपली भूमिका मांडली. "आम्ही हिंदू असूनही आमच्या सणात आम्हाला रोखले जाते. केवळ राजकारण करणारे असे खोटे हिंदू खऱ्या हिंदू धर्म चालवणाऱ्या लोकांना अडवत आहेत," असे ते म्हणाले. "गणेशोत्सवाला गालबोट लागेल असे पाऊल आम्ही मेलो तरी उचलणार नाही," असे आश्वासन त्यांनी दिले. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना, 'त्यांना आपली चूक झाकायची आहे म्हणून आता देवांना पुढे करत आहेत' असे म्हटले.
तुमच्या आडमुठे धोरणामुळे मराठा तरुणांच्या आत्महत्या
जरांगे पाटील यांनी काल एका तरुणाने केलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नाचा उल्लेख करत देवेंद्र फडणवीसांना भावनिक आवाहन केले. "फडणवीस साहेब अजूनही वेळ गेली नाही, मराठ्यांचा संयम ढासळू देऊ नका. ही बलिदानं तुमच्यामुळे गेली आहेत, याचं सगळं पाप तुमच्या डोक्यावर आहे. आमच्या शेकडो आत्महत्या तुमच्या आडमुठे धोरणामुळे झाल्या आहेत. मराठ्याच्या पोरांना हात जोडून विनंती आहेत, तुम्ही आत्महत्या करू नका, असं आवाहन मनोज जरांगे पाटलांनी केलं आहे.
मुंबईला येतो मला गोळ्या घाला
मी स्वतः बलिदान देण्यास तयार असल्याचे जाहीर केले. "मी मुंबईत येतो, मला मारा. मला गोळ्या घाला. मी बलिदान देण्यासाठी तयार आहे. माझा जीव गेला तरीही मी हटणार नाही, असा माझा निर्धार आहे," असे म्हणत त्यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.
धनगर समाजाचे नेतेही मराठा समाजाला पाठिंबा देण्यासाठी येत असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले आहे. आपल्या भाषणाच्या शेवटी जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला बेसावध न राहण्याचे आणि लढाई जिंकेपर्यंत मुंबईकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, "परवानगी येत असते आणि जात असते, आपण मागे हटत नाही." या सर्व घटना पाहता, गणेशोत्सवाच्या काळात मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिकच तापलेला दिसतो आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world