सुनील दवंगे, शिर्डी
Ahilyanagar News: अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात शनिशिंगणापूर रस्त्यावरील पिंपरी अवघड शिवारात भीषण अपघात झाला आहे. मिनीबस आणि रिक्षा यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर काही काळासाठी नगर-मनमाड रस्त्यावर एकच गोंधळ उडाला होता..
रिक्षाचा चक्काचूर
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील भाविकांना घेऊन जाणारी रिक्षा आणि समोरून येणारी मिनीबस यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेचा जोर इतका भीषण होता की रिक्षाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. तर मिनीबस रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाली. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.
या अपघातात रिक्षामधील चार भाविकांचा मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले. मिनीबस मधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने स्थानिक नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच राहुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. शनिशिंगणापूर दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर अचानक काळाने घाला घातल्याने मृतांच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world