जाहिरात

Nagpur Pune Vande Bharat: नागपूर, पुण्याहून वंदे भारत कधी सुटणार? स्टेशन आणि तिकीट दराबद्दलची सगळी माहिती

Ajni-Pune Vande Bharat Express: या ट्रेनमध्ये 535 आसनांची व्यवस्था असून, त्यात 7 चेअर कार आणि 1 एक्झिक्युटिव्ह चेअर कार असे एकूण 8 डबे आहेत.

Nagpur Pune Vande Bharat: नागपूर, पुण्याहून वंदे भारत कधी सुटणार? स्टेशन आणि तिकीट दराबद्दलची सगळी माहिती
नागपूर:

विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला थेट जोडणारी बहुप्रतिक्षित नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस अखेर सुरू झाली आहे. नागपूरमधील अजनी स्टेशनवरून सुटणाऱ्या या ट्रेनमुळे दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. रविवार, 10 ऑगस्ट रोजी नागपूरच्या मुख्य रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वर एका भव्य कार्यक्रमात या ट्रेनचे उद्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन प्रणालीद्वारे देशातील एकूण तीन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला, ज्यात नागपूर-पुणे एक्सप्रेसचा समावेश होता.

( नक्की वाचा: नागपूर-पुणे 'वंदे भारत' पहिल्याच दिवशी लेट, 'या' कारणामुळे कोलमडलं वेळापत्रक )

प्रवासाला किती वेळ लागणार? ( Ajni-Pune Vande Bharat Express: Distance, Travel Time )

नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस ही महाराष्ट्राची बारावी वंदे भारत ट्रेन आहे. या ट्रेनमुळे आता राज्याला हाय-स्पीड रेल नेटवर्कच्या माध्यमातून जोडले जाणार आहे. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नवीन ट्रेनमुळे देशातील वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची एकूण संख्या 72 वर पोहोचली आहे. या सर्व ट्रेन्स आता 24 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 144 मार्गांवर धावत आहेत. येत्या तीन वर्षांत ही संख्या 200 पर्यंत वाढवण्याची केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. अजनीहून पुणे गाठणारी ही देशातील सर्वाधिक लांब अंतराची वंदे भारत ट्रेन आहे. अजनी पुणे वंदे भारत ट्रेन 881 किलोमीटरचे अंतर पार करणार आहे. हा प्रवास सुमारे 12 तासांत पूर्ण होईल. खासगी बसेसना हे अंतर कापण्यासाठी साधारणपणे 15 ते 16 तास लागतात. म्हणजेच या प्रवासासाठी प्रवाशांचा 3-4 तासांचा वेळ वाचणार आहे. या ट्रेनचा सरासरी वेग 73 किलोमीटर प्रति तास असेल. 

कसे असेल वेळापत्रक? ( Ajni-Pune Vande Bharat Express: Train Number, Frequency )

मध्य रेल्वेच्या वेळापत्रकानुसार, ही ट्रेन नागपुरातील अजनी स्थानकातू सकाळी 9:50 वाजता नागपूरच्या अजनी स्थानकावरून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 9:50 वाजता पुण्यात पोहोचेल. तर पुण्याहून ही ट्रेन सकाळी 6:25 वाजता सुटेल आणि नागपूरच्या अजनी स्थानकावर त्याच दिवशी सायंकाळी 6:25 वाजता पोहोचेल. ही ट्रेन आठवड्यातील 6 दिवस धावणार असून पुण्यावरून ही ट्रेन मंगळवारी सुटणार नाही तर अजनीवरून सोमवारी सुटणार नाही. अजनी-पुणे वंदे भारत या गाडीचा 26102 असणार आहे तर पुणे-अजनी वंदे भारत ट्रेनचा नंबर 26101 असणार आहे. 

( नक्की वाचा: देव दर्शनाला जाणाऱ्या महिलांवर काळाचा घाला, 8 जणींचा मृत्यू तर 20 जखमी )

काय आहे या वंदे भारतची खासियत? (Ajni-Pune Vande Bharat Express Features)

या ट्रेनमध्ये 535 आसनांची व्यवस्था असून, त्यात 7 चेअर कार आणि 1 एक्झिक्युटिव्ह चेअर कार असे एकूण 8 डबे आहेत. मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, एक्झिक्युटिव्ह चेअर कारच्या तिकीटाचे दर सुमारे 3,000 रुपये इतके आहे, तर सामान्य चेअर कारचे तिकीट 1,500 रुपयांना इतके आहे. प्रवाशांसाठी ट्रेनमध्ये अनेक अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत, ज्यात मोठ्या पॅनोरमिक खिडक्या, स्लायडिंग दरवाजे, आरामदायी खुर्च्या, अग्निशमन सुरक्षा प्रणाली, सीसीटीव्ही कॅमेरे आणि आपत्कालीन इंटरकॉम यांचा समावेश आहे. तसेच, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग प्रणालीमुळे 30 टक्के ऊर्जा वाचण्यास मदत होते, असा दावाही मध्य रेल्वेने केला आहे.

( नक्की वाचा: दिल्ली तत्काळ भटके कुत्रेमुक्त करा! सुप्रीम कोर्टाचा कडक शब्दात आदेश )

ही देशातील सर्वाधिक लांब पल्ल्याचे अंतर कापणारी वंदे भारत ट्रेन असणार आहे. ही ट्रेन 881 किलोमीटरचे अंतर 12 तासात पूर्ण करणार आहे. खासगी ट्रॅव्हल्सच्या बसेसना हे अंतर कापण्यासाठी 15-16 तास लागतात. ही ट्रेन 10 स्टेशनवर थांबणार असून ही स्टेशन खालीलप्रमाणे आहेत. 

  1. वर्धा, 
  2. बडनेरा, 
  3. अकोला, 
  4. शेगांव, 
  5. भुसावळ, 
  6. जळगाव, 
  7. मनमाड, 
  8. कोपरगाव, 
  9. अहिल्यानगर, 
  10. दौंड


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com