जाहिरात

Nanded News: आई-वडिलांनी खाटेवरच जीव सोडला, मुलांचे रेल्वे ट्रॅकवर मृतदेह सापडले; नांदेडमध्ये भयंकर घडले

Nanded News: पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही सामूहिक आत्महत्या असावी असा संशय आहे. रमेश आणि राधाबाई यांचा मृत्यू घरात झाला असताना दोन्ही मुलांनी धावत्या ट्रेनसमोर उडी घेऊन आपले जीवन संपवले असावे, असा अंदाज वर्तवला जात आहे.

Nanded News: आई-वडिलांनी खाटेवरच जीव सोडला, मुलांचे रेल्वे ट्रॅकवर मृतदेह सापडले; नांदेडमध्ये भयंकर घडले

योगेश लाठकर, नांदेड

नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील ज्वाला मुरार गावात एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. पेशाने शेतकरी असलेल्या रमेश सोनाजी लखे (51 वर्षे) आणि त्यांच्या पत्नी राधाबाई लखे (45 वर्षे) यांचे मृतदेह त्यांच्या राहत्या घरात खाटेवर आढळून आले. तर दुसरीकडे त्यांचे दोन तरुण मुलगे उमेश (25 वर्षे) आणि बजरंग (23 वर्षे) यांचे मृतदेह जवळच असलेल्या रेल्वे रुळावर छिन्नविच्छिन्न अवस्थेत सापडले.

लखे कुटुंबाची सामूहिक आत्महत्या?

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही सामूहिक आत्महत्या असावी असा संशय आहे. रमेश आणि राधाबाई यांचा मृत्यू घरात झाला असताना दोन्ही मुलांनी धावत्या ट्रेनसमोर उडी घेऊन आपले जीवन संपवले असावे, असा अंदाज वर्तवला जात आहे. पोलीस निरीक्षक दत्तात्रेय मंथले यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.

नक्की वाचा- Santosh Deshmukh Case: "मला बोलायचंय", कोर्टाने दोनच शब्दात वाल्मीक कराडचं तोंड केलं बंद, सुनावणीत काय घडलं?)

फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले असून मृतदेहांचे शवविच्छेदन झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. हा परिवार कष्टकरी शेतकरी म्हणून ओळखला जात होता. या घटनेमागे लखे कुटुंबासमोरील आर्थिक विवंचना आहे की अन्य काही कौटुंबिक कारण, याचा तपास पोलीस करत आहेत.

कष्टाळू कुटुंबाने टोकाचा निर्णय का घेतला?

मिळालेल्या माहितीनुसार, लखे परिवार हा अल्पभूधारक शेतकरी होता. लखे कुटुंबीय अत्यंत कष्टाळू होते. एकाच वेळी कुटुंबातील सर्वांनी टोकाचे पाऊल का उचलले, याचे गूढ अद्याप कायम आहे. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत.

(नक्की वाचा- पुणे-मुंबई महामार्गावरील सोमटणे फाटा, वरसोली टोलनाके बंद पाडणार; आमदार सुनील शेळकेंचा इशारा)

नांदेड ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून नातेवाईकांचे जबाब घेण्याचे काम सुरू आहे. तांत्रिक तपास आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल मात्र. एकाच कुटुंबातील चार जणांच्या मृत्यूने ज्वाला मुरार गावातील ग्रामस्थांना मोठा धक्का बसला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com