
स्मशानभूमीच्या जागेवरून दोन गावात प्रचंड वाद झाला आहे. नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातील मनुर आणि संगम या दोन गावात हा वाद झाला. मनुर गावात स्मशानभूमीसाठी जागा नसल्याने जवळच असलेल्या संगम या गावात स्मशानभूमीसाठी जागा निश्चित करण्यात आल्याची माहिती महसूल विभागाने दिली आहे. मात्र त्याला संगम गावच्या गावकऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळे मनुर गावातील गावकऱ्यांची अडचण झाली आहे. गावात जर कुणाचा मृत्यू झाला तर त्याच्यावर अंत्यसंस्कार कुठे करायचे असा प्रश्न या गावकऱ्यां पुढे आहे. त्यातूनच आज मोठा वाद झाला.
नक्की वाचा - Javed Sheikh: काम ड्राव्हरचं, घर पत्र्याचं, तरही 500 कोटीचा मालक, कोण आहे जावेद शेख?
जी जागा मनुर या गावासाठी देण्याचा निर्णय झाला आहे, त्यावरून हीवाद आहे. ही जागा स्मशानभूमीसाठी संगम गावचे गावकरी देण्यास तयार नाहीत. त्यात आज मनुर येथील एका व्यक्तीचे निधन झाले होते. त्या व्यक्तीचे अंत्यविधी करण्यासाठी मनुरचे गावकरी संगम गावाकडे अंत्यसंस्कारासाठी चालले होते. गायरानात ते अंत्यविधी करणार होते. त्यासाठी त्यांनी तयारीही केली होती. याला संगम गावच्या गावकऱ्यांनी तीव्र विरोध केला. यावेळी दोन्ही गावचे गावकरी आपापसात भिडले. त्यामुळे जोरदार राडा पाहायला मिळाला.
हा राडा वाढला. त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी मागवण्यात आला. पोलीस बंदोबस्तात संगमच्या गायरान जमिनीवर अंत्यविधी पार पडला.परंतु महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच पोलीस अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने वाद मिटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान संगम या गावचे गावकरी संगम येथील गायरान जागा देण्यास तयार नाहीत. तणाव असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यामुळे भविष्यात हा वाद पुन्हा उफाळून येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे वेळीच उपाय योजना करण्याचे आव्हान प्रशासना समोर आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world