Navi Mumbai Election 2026: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारण चांगलेच तापले असून, सत्तेसाठी पैसा आणि पैशाच्या जोरावर सत्ता मिळवण्याचे राजकारण करणाऱ्या पक्षांना थेट आव्हान देण्याची भूमिका ‘दोन्ही ठाकरे युती'ने (शिवसेना–मनसे) जाहीर केली आहे. पैशाच्या बळावर प्रचार यंत्रणा उभी करणे, माणसे भाड्याने आणणे आणि कार्यकर्त्यांची खरेदी करून निवडणुका लढवल्या जात असल्याचा आरोप युतीच्या नेत्यांनी केला. मनसे नेते गजानन काळे यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
'ही निवडणूक गद्दारांच्या विरोधात'
“ही निवडणूक पक्ष बदलू आणि गद्दारांच्या विरोधात आहे. निष्ठा, विचार आणि कार्यकर्त्यांच्या बळावरच आम्ही मैदानात उतरलो आहोत,” असे स्पष्ट मत युतीकडून व्यक्त करण्यात आले. गेल्या काही वर्षांत शिवसेनेतील अनेक नगरसेवकांनी पक्षांतर केले असले, तरी त्यांच्यासोबत तळागाळातील निष्ठावंत कार्यकर्ता गेलेला नाही, हे चित्र नवी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात दिसून येत असल्याचा दावा ठाकरे युतीने केला. “खरी ताकद ही पदांमध्ये नसून कार्यकर्त्यांमध्ये असते,” असे सांगत नवी मुंबईत सध्या ठाकरेंच्या विचारसरणीच्या बाजूने अंडरकरंट असल्याचे चित्र असून, मराठी माणूस पुन्हा एकदा जागृत होत असल्याचा दावा युतीकडून करण्यात आला.
Solapur News: डोळ्यात चटणी टाकली अन् सपासप वार.. मनसे नेत्याच्या हत्येची INSIDE स्टोरी
महिला-पुरुष अशा समाजातील विविध घटकांचे प्रतिनिधित्व करणारे, सर्वसामान्य पार्श्वभूमीतील उमेदवार युतीकडून मैदानात उतरवण्यात आले असल्याचेही सांगण्यात आले. सत्ताधारी बाजूकडून कॉन्ट्रॅक्टर असलेले नगरसेवक आणि कुटुंबातील, विशेषतः मुलांना राजकारणात पुढे आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीकाही ठाकरे युतीने केली. “आम्ही शपथपत्र देतो की सभागृहात सर्वसामान्य आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांनाच पाठवू,” असा ठाम निर्धार युतीच्या नेत्यांनी व्यक्त केला.
लवकरच जाहीरनामा प्रसिद्ध होणार
नवी मुंबईतील स्थानिक प्रश्न, नागरी हक्क, अन्याय आणि जनतेच्या अपेक्षा यावर आधारित ठाकरे युतीचा जाहीरनामा लवकरच प्रसिद्ध केला जाणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. “नवी मुंबईकर आमच्या शिव-मनसे युतीला पाठिंबा देतील आणि भरघोस मतांनी आमचे उमेदवार निवडून देतील,” असा विश्वास युतीच्या सर्व सहकाऱ्यांनी व्यक्त केला. “शिंदे सेना आणि भाजप हे आमचे राजकीय शत्रू आहेत. नवी मुंबईची वाट लागू नये आणि नवी मुंबईचे ठाणे होऊ नये, यासाठी ही लढाई आहे,” असे मनसे नेते गजानन काळे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
VBA Candidate List: वंचित आघाडीच्या 46 उमेदवारांची फायनल यादी समोर; 1 अर्ज बाद; पाहा सर्व उमेदवार
माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, ही निवडणूक केवळ सत्ता मिळवण्यासाठी नसून नवी मुंबईचे स्वतंत्र अस्तित्व, स्वाभिमान आणि लोकशाही मूल्ये जपण्यासाठी आहे. दरम्यान, नवी मुंबईत ठाकरे युतीकडून एकूण 95 उमेदवार रिंगणात आहेत. ज्यामध्ये मनसेचे 25 आहेत तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार 56 आहेत. तिकीट न मिळाल्याने युतीतीलच 14 उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world