सुनील कांबळे, लातूर
लातूरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून ओला इलेक्ट्रिक बाईकच्या ग्राहकांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. ओलाकडून सर्व्हिस मिळत नसल्याने संतप्त वाहनधारकांनी शोरुमच्या समोर गाड्या उभ्या करुन जाळण्याचा प्रयत्न केला आहे. गाड्या दुरुस्त करण्यासाठी दोन ते तीन महिन्यापासून शोरुमकडून उडवा-उडवीची उत्तरं देण्यात येत होती. जिल्ह्यात 5 हजार पेक्षा अधिक ओला इलेक्ट्रिक बाईकची विक्री झाल्याची माहिती आहे. मात्र ओला कंपनीकडून कसल्याही प्रकारची ग्राहकांना सेवा मिळत नसल्याने लातूरकरांमध्ये आता नाराजीचा सुर पाहायला मिळतोय.
कंपनीच्या विरोधात ग्राहकांची नाराज
देशात आता पर्यावरणपूरक म्हणून इलेक्ट्रिक बाईकला पसंती दिली जात आहे. तसेच इलेक्ट्रिक बाईक मायलेजमध्येही परवडत असल्याने ग्राहकांची पसंती ओला इलेक्ट्रिक बाईकला आहे. मात्र गेल्या अनेक दिवसापासून ग्राहकांना सर्व्हिस मिळत नसल्याने नाराजीचा सूर आहे. लातूरमधील बार्शी रोडवरील ओला शोरुममध्ये शेकडो गाड्या धूळखात पडल्या आहेत. इलेक्ट्रिक बाईक दुरुस्त करण्यासाठी मेकॅनिक उपलब्ध नसल्याने ग्राहकांच्या बाईक धूळखात पडल्या आहेत.
शोरुममध्ये एकही कर्मचारी नाही
लातूर जिल्ह्यात ओलाकडून 5 हजार इलेक्ट्रिक बाईकची विक्री केली गेली आहे. सुरुवातीच्या काळात ग्राहकांकडून इलेक्ट्रिक बाईकला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र अल्पावधीतच अनेक समस्या येत असल्याने बाईकधारकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे शोरूममध्ये काम करण्यासाठी एकही कर्मचारी उपलब्ध नाही.
गेल्या अनेक दिवसांपासून ओला इलेक्ट्रिक बाईक दुरुस्त होत नसल्याने आणि शोरुमकडूननी उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत असल्याने संतप्त ग्राहकांनी गाड्यावर पेट्रोल टाकून गाड्या जाळण्याचा देखील प्रयत्न केला. आता शोरुमच्या बाहेर वाहनधारकांनी मोठी गर्दी केल्याने इलेक्ट्रिक बाईक दुरुस्त करण्यासाठी 15 दिवसांची वेळ मागितली आहे. शोरुमचा मॅनेजर उपलब्ध नसल्याने फोनवरून त्याच्याशी संपर्क केला असता पंधरा दिवसात गाड्या दुरुस्त करून देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world