
उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी धराली येथे झालेल्या भूस्खलन आणि पूरसदृश परिस्थितीमुळे महाराष्ट्रातील पर्यटकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. या घटनेत अडकलेल्या एकूण 172 पर्यटकांपैकी 171 पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे, मात्र कृतिका जैन नावाच्या एका पर्यटकाचा अद्याप शोध लागलेला नाही. प्रशासनाकडून तिच्याशी संपर्क साधण्याचे आणि तिला शोधण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
( नक्की वाचा: उत्तराखंडच्या महाप्रलयातील दिलासादायक बातमी! पुण्यातील 'ते' 24 जण सुखरुप )
कृतिका जैन यांचा शोध सुरू
राज्य आपत्कालीन कार्य केंद्र (SEOC) महाराष्ट्र हे SEOC उत्तराखंड आणि जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्र (DEOC) उत्तरकाशी यांच्याशी सतत समन्वय साधत आहे. बेपत्ता असलेल्या कृतिका जैन यांच्या शेवटच्या मोबाईल लोकेशनचा शोध घेण्यात आला. डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन्सच्या अधिकृत माहितीनुसार, त्यांचे शेवटचे लोकेशन 5ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता घटनास्थळाच्या जवळपास असल्याचे समजले आहे. या माहितीच्या आधारे शोध व बचाव पथकांना घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. प्रशासनाकडून जिल्हाधिकारी उत्तरकाशी, SEOC उत्तराखंड, DEOC उत्तरकाशी, NDRF मुख्यालय, दिल्ली आणि NDRF टीम कमांडर धराली यांना यासंदर्भात लेखी आणि तोंडी सूचना देण्यात आल्या आहेत.
(नक्की वाचा: बाबा, आम्ही वाचणार नाही… हर्षिल खोऱ्यातून आला शेवटचा फोन)
प्रवाशांना हेलिकॉप्टरने सुरक्षितस्थळी आणले
बचाव कार्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्यांनाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हर्षिल आयटीबीपी कॅम्प येथे अडकलेल्या उर्वरित 21 पर्यटकांनाही उत्तराखंड प्रशासनाच्या मदतीने हेलिकॉप्टरच्या माध्यमातून सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आले आहे. कृतिका जैन यांच्या नातेवाईकांनीही प्रशासनाशी संपर्क साधून त्यांच्याबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रशासनाकडून लवकरच त्यांना शोधण्यात येईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
गिरीश महाजन उत्तरकाशीत
राज्याचे आपत्ती व्यवस्थापन तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे स्वतः परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उत्तरकाशी येथील घटनास्थळी दाखल झाले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असून, राज्याच्या आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्य सचिवांनी अपर मुख्य सचिव (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग) यांच्यासह आढावा घेतला असून, त्यांनी उत्तराखंडचे मुख्य सचिव आनंद बर्धन यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून महाराष्ट्रातील नागरिकांना मदत करण्याची विनंती केली आहे.
( नक्की वाचा: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाचा 'यलो अलर्ट' )
160 पर्यटकांना मातली, जॉली ग्रँट आणि उत्तरकाशीत आणले
सध्याच्या माहितीनुसार, सुरक्षित असलेल्या 171 पर्यटकांपैकी 160 पर्यटक मातली, जॉली ग्रँट आणि उत्तरकाशी येथे सुरक्षित आहेत. या पर्यटकांनी त्यांच्या नियोजित कार्यक्रमानुसार पुढील प्रवास सुरू केला आहे. हर्षिल येथे अडकलेल्या 11 पर्यटकांना आज सकाळी 6 वाजल्यापासून हेलिकॉप्टरने सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे कार्य सुरू झाले आहे. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून ही माहिती देण्यात आली आहे.
उत्तराखंडमधील बचाव कार्यासाठी लष्कर, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) आणि स्थानिक बचाव पथके धराली येथे कार्यरत आहेत. संपर्क यंत्रणा अंशत: सुरू झाल्या असल्या तरी, रस्ते अद्याप पूर्ववत झालेले नाहीत. पायाभूत सुविधा पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. बचाव कार्याची गती वाढवण्यासाठी पोलीस महानिरीक्षक राजीव स्वरूप यांच्या माध्यमातून उपग्रह फोन (Satellite Phone) तैनात करण्यात आले आहेत. तसेच, लष्कराच्या छोट्या उड्डाण मोहिमाही सुरू झाल्या आहेत.
मदत आणि माहितीसाठी संपर्क क्रमांक
- राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, महाराष्ट्र – 9321587143 / 022-22027990 / 022-22794229
- डॉ. भालचंद्र चव्हाण, संचालक, आपत्ती व्यवस्थापन केंद्र, महाराष्ट्र – 9404695356
- राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, उत्तराखंड – 0135-2710334 / 8218867005
- प्रशांत आर्य, जिल्हाधिकारी, उत्तरकाशी – 9412077500 / 8477953500
- मेहेरबान सिंग (समन्वय अधिकारी) – 9412925666
- मुक्ता मिश्रा, सहाय्यक जिल्हाधिकारी, उत्तरकाशी – 7579474740
- जय पनवार, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, उत्तराखंड – 9456326641
- सचिन कुरवे (समन्वय अधिकारी) – 8445632319
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world