जाहिरात

Pandharpur News: रिलस्टार महिलेला वाढदिवसाचं भयंकर 'गिफ्ट'; अख्ख गाव हादरलं! प्रियकराला अटक

Pandharpur Crime News: पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील प्रसिद्ध 'रीलस्टार' सोनाली जाधव हिची तिच्या वाढदिवसाच्या दिवशीच गळा दाबून हत्या करण्यात आली. चारित्र्याच्या संशयावरून प्रियकरानेच हे टोकाचे पाऊल उचलले.

Pandharpur News: रिलस्टार महिलेला वाढदिवसाचं भयंकर 'गिफ्ट'; अख्ख गाव हादरलं! प्रियकराला अटक

संकेत कुलकर्णी, पंढरपूर

पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील एका रिलस्टार महिलेची तिच्या वाढदिवसीच हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोनाली जाधव असे या मृत रीलस्टारचे नाव असून, तिच्या प्रियकरानेच चारित्र्यावर संशय घेऊन तिचा गळा दाबून खून केला आणि मृतदेह कालव्यात फेकून दिला. या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.

प्रेमप्रकरणाचा अंत

सोनाली जाधव ही विवाहित होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून ती भोसे येथील आपल्या वडिलांकडे राहत होती. इन्स्टाग्रामवर ती दररोज रिल्स बनवत असल्याने गावात तिची ओळख 'रीलस्टार' म्हणून झाली होती. याच काळात तिचे गावातीलच तुकाराम गावांधरे याच्याशी प्रेमसंबंध जुळले. दोघेही एकमेकांना नियमित भेटत असत.

(नक्की वाचा-  Dharashiv News: तहसीलदारांना मुलीसमोरच गाडी अडवून जीवे मारण्याची धमकी; परंडा तहसील कार्यालयातील प्रकार)

गिफ्ट देण्याच्या बहाण्याने बोलावले... 

सोनाली गावातील इतर लोकांशी बोलते, याचा राग तुकारामच्या मनात होता. तिच्या चारित्र्यावर तो संशय घेऊ लागला होता. सोनालीच्या वाढदिवसाच्या दिवशी 'तुला गिफ्ट देतो' असे सांगून तुकारामने तिला बोलावले. भेटीदरम्यान दोघांमध्ये सोन्याच्या दागिन्यांवरून आणि इतर लोकांशी बोलण्यावरून जोरदार भांडण झाले. हा वाद विकोपाला गेला आणि संतापलेल्या तुकारामने सोनालीचा गळा दाबला.  सोनाली बेशुद्ध पडल्यानंतर, ती मृत झाल्याचे समजून तुकारामने तिचा देह जवळच असलेल्या कालव्यात फेकून दिला.

(नक्की वाचा-  VIDEO: मिरा-भाईंदरमधील रस्त्यावर 'झॉम्बी'? मुंबईसह परिसरात घबराट; काय आहे प्रकरण?)

आरोपीला बेड्या

सोनाली रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने तिच्या वडिलांनी करकंब पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी तपास सुरू केला असता, त्यांना कालव्यात एक महिला मृतावस्थेत आढळली. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तुकाराम गावांधरे याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला आणि हत्येचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. करकंब पोलिसांनी आरोपी तुकारामविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com