Beed News: गोपीनाथ मुंडेंच्या राजकीय वारसदार कोण यावरून सुरू असलेल्या चर्चांवर पंकजा मुंडे यांनी भाष्य केलं आहे. परळी येथे दिवाळीनिमित्त आयोजित स्नेहमिलन कार्यक्रमात मंत्री पंकजा मुंडे यांनी स्वतःला गोपीनाथ मुंडे यांच्या वारसदार घोषित केले. तसेच, त्यांनी वैद्यनाथ कारखाना विकलेला नाही, असेही स्पष्ट केले. मात्र, याच कार्यक्रमात सारंगी महाजन यांनी थेट पंकजा आणि धनंजय मुंडे यांच्यावर "जमिनी लाटण्यासाठी एकत्र आले" असल्याचा गंभीर आरोप करत, गोपीनाथ मुंडेंचे खरे वारसदार कार्यकर्ते आणि जनता असल्याचे म्हटले आहे.
काय म्हणाल्या सारंगी महाजन?
सारंगी महाजन यांनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यावर थेट हल्ला चढवला. सारंगी महाजन म्हणाल्या, "गोपीनाथ मुंडे यांचे खरे वारसदार त्यांचे कार्यकर्ते आणि बीडमधील जनता आहे. हे बहीण-भाऊ केवळ जमिनी लाटण्यासाठी एकत्र आले असून, त्यांनी माझीही जमीन लाटली आहे." आज गोपीनाथ मुंडे असते तर बीडमध्ये शांतता असती. या दोघांना त्यांनी कधीच पुढे आणले नसते. या दोघांच्या राजकारणामुळे बीडमधील जनता प्रचंड नाराज आहे, असेही सारंगी महाजन यांनी यावेळी सांगितले.
(नक्की वाचा- Dombivli News: विकास कामावरून डोंबिवलीत चिमटे अन् कोपरखळ्यांचा खेळ, एका राजीनाम्यानंतर काय घडलं?)
गोपीनाथ मुंडे यांची मीच वारस - पंकजा मुंडे
मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या 40 मिनिटांच्या भाषणात विविध मुद्द्यांवर भाष्य केले. छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडे यांना गोपीनाथ मुंडेंचे वारसदार म्हटले होते. त्यालाही पंकजांनी यावेळी उत्तर दिले. त्या म्हणाल्या, "गोपीनाथ मुंडे यांची मीच वारस आहे. वैद्यनाथ कारखाना हा गोपीनाथ मुंडे यांचे चौथे अपत्य होता. मी कारखाना विकलेली पंकजा मुंडे नाही." सर्व कारखान्यांना शासनाकडून मदत मिळाली, पण वैद्यनाथला मिळाली नाही, त्यामुळे काही कारणांनी वैद्यनाथचा लिलाव झाला. मात्र असे असले तरी यावर्षी कारखाना 10 लाख मेट्रिक टन ऊस गाळप करणार आहे.
या कार्यक्रमात गेवराईचे माजी मंत्री बदामराव पंडित व धारूरचे माधव निर्मळ यांनी भाजपत प्रवेश केला. बदामराव पंडितांनी तिसऱ्यांदा पक्षबदल केला आहे. या घडामोडींमुळे बीड जिल्ह्याच्या राजकारणात 'गोपीनाथ मुंडेंचा वारसदार' या मुद्द्यावरून सुरू असलेल्या चर्चांना आणखी धार चढली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world