जाहिरात
This Article is From Jun 16, 2024

आत्महत्या थांबवा अन्यथा राजकारण सोडेन; पंकजा मुंडेंना अश्रू अनावर

राजकारणात जय-पराजय होतच राहतात. मात्र टोकाचा निर्णय घेऊ नका अशी माझी सर्वांना विनंती आहे, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं.

आत्महत्या थांबवा अन्यथा राजकारण सोडेन; पंकजा मुंडेंना अश्रू अनावर

स्वानंद पाटील, बीड

बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर बीड जिल्ह्यात दोघांनी आत्महत्या केल्या होत्या. यातील चिंचेवाडी येथील पोपट वायभासे यांच्या कुटुंबाला पंकजा मुंडे यांनी भेट दिली. यावेळी कुटुंबियांना धीर देताना पंकजा मुंडे यांना देखील अश्रू अनावर झाले. माध्यमांशी बोलताना आता आत्महत्या करू नका. मला लढण्यासाठी बळ द्या. आत्महत्या थांबल्या नाही तर मी राजकारण सोडून देईल, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आत्महत्यांच्या घटनांनी मी खूप अस्वस्थ होते. माझ्या प्रकृतीवर देखील परिणाम झाला, मी शब्दांत सांगू शकत नाही. मी कधीही कार्यकर्त्यांना यंत्रासारखं वापरलं नाही. मी त्यांना नेहमी माझ्या कुटुंबातील सदस्य मानलं. त्यांना मी जीव लावला. माझा पराभव झाला म्हणून हे लोक जीव देत आहेत, हे मला अजिबात मान्य नाही. मागील 10 वर्षांपासून मी राजकारणात आहे, मी कधीही स्वत:चं संतुलन बिघडू दिलं नाही. मात्र या घटनांमुळे कमकुवत झाले आहे. मला खूप अपराधी वाटतंय. कारण माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना मी काहीच देऊ शकत नाही, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं. 

(नक्की वाचा - पंकजा मुंडेंचा पराभव जिव्हारी, लातूरनंतर बीडमधील तरुणाने उचललं टोकाचं पाऊल)

राजकारणात जय-पराजय होतच राहतात. मात्र टोकाचा निर्णय घेऊ नका अशी माझी सर्वांना विनंती आहे. आपला जीव द्यावा एवढं प्रेम नेत्यावर करु नका. तुम्हाला हिमतीने लढणारा नेता हवात, तर मला हिमतीने लढणार कार्यकर्ता हवा आहे. अजून कुणी असं वागलं तर राजकारणामुळे असं होतंय असं समजून मी राजकारण सोडून देईन, असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं. आत्महत्यांचं सत्र आता इथेच थांबवा. हिमतीने माझ्या पाठीशी उभे राहा. आगामी 100 दिवसात हे सगळे चित्र बदलून टाकू, असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं. 

( नक्की वाचा : पराभूत होऊनही मोदींनी थोपटली पंकजा मुंडेंची पाठ, दिल्लीत नेमकं काय झालं?)

आतापर्यंत चार आत्महत्या

पंकजा मुंडे यांनी रविवारी आत्महत्या केलेल्या समर्थकांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. दरम्यान बीड जिल्ह्यात तिसरी आत्महत्या झाल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे आधी बीडमधील डिघोळ आंबा पांडुरंग सोनवणे, त्यानंतर चिंचेवाडीतील पोपट वायभासे यांनी आपले जीवन संपवले होते. आज पंकजा मुंडे यांचा सांत्वन दौरा सुरू असतानाच वारणी येथील गणेश उर्फ हरिभाऊ भाऊसाहेब बडे या युवकाने आज आपले जीवन संपवले आहे. याआधी लातूरमध्ये सचिन मुंडे या तरुणाने आत्महत्या केली होती.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: