
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्यात धार्मिक आणि जातीयवादी तेढ निर्माण करत आहेत, असा घणाघाती आरोप करत वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधानांच्या नागपूर दौऱ्यावरुन टीका केली आहे. राज्यात नरेंद्र मोदी हे धार्मिक, जातीयवादी तेढ निर्माण करायला आले आहेत, असं वाटते.. असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीटरवरुन जोरदार टीकास्त्र केले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्यात नरेंद्र मोदी धार्मिक, जातीय तेढ निर्माण करायला आले आहेत, असे वाटते. नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या खुशीत हिंदुत्ववाद्यांनी धार्मिक तेढ वाढवण्यासाठी बीडमध्ये रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर एका मशिदीत जिलेटिनचा स्फोट घडवला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही, यात दोन आरोपींना पकडले गेले.
दुसऱ्या बाजूला, मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंहचा मालेगावातच आज जाहीर सत्कार करून 'हिंदूवीर' पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात कोरेगाव भीमा हल्ल्यातील आरोपी मिलिंद एकबोटे देखील असणार आहे. हा सगळा घटनाक्रम पाहता गुजरात मॉडेल महाराष्ट्रात राबवण्याचा आरएसएसचा डाव आहे अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. या संदर्भातील भूमिका त्यांनी ट्विटद्वारे मांडली आहे.
धार्मिक तेढ निर्माण करणारे गुजरात मॉडेल आरएसएसला महाराष्ट्रात राबवायचे आहे. त्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांना अशा कार्यक्रमांमधून प्रशिक्षित करण्याचा आरएसएसचा उद्देश आहे. बीड आणि मालेगाव या दोन्ही घटना धार्मिक, जातीय तेढ वाढवून आपला राजकीय डाव साधणाऱ्या आहेत. यावर काँग्रेस नेहमीप्रमाणे गप्प आहे! फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी या विरोधात लढत आहे. महाराष्ट्राला धार्मिक तेढ आणि जातीयवादाचे केंद्र होऊ देणार नाही. या विरोधात आम्ही लढत राहू! आपले कोण? परके कोण? हे ओळखा!, असे आवाहनही त्यांनी ट्विटद्वारे केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world