अजिंक्य धायगुडे, पुणे:
Pune Crime: प्रेमप्रकरणातून तरुणाची बेदम मारहाण करुन हत्या करण्यात आल्याची भयंकर घटना पुणे शहरात घडली आहे. याप्रकरणी मुलाच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून दहा जणांविरुद्ध कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन प्रेयसीच्याच मोबाईलवरुन मेसेज करुन तरुणाला बोलावून घेण्यात आले त्यानंतर त्याचा जीव घेतला. या भयंकर घटनेने पुणे शहरात खळबळ उडाली आहे.
पुण्यात सैराट, तरुणाची निर्घृण हत्या
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्यामध्ये सैराटसारखी भयंकर घटना घडली आहे. प्रेमप्रकरणातून प्रेयसीच्या कुटुंबियांनी तिच्या प्रियकराचा घरी बोलावून मारहाण करत जीव घेतल्याने खळबळ उडाली आहे. नागेश जाधव असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. नागेश हा आपल्या आईसह पुण्यात राहतो. तो शिवाजीनगर येथे ऑफिस बॉय म्हणून काम करत होता तर त्याची आई घरकाम करते.
मेसेज करुन बोलावून घेतलं
१४ मार्चला नागेशला फोन आला. तो फोन आल्यानंतर तो तातडीने घराबाहेर पडला. त्यानंतर रात्री आठच्या सुमारास त्याच्या कुटुंबियांना फोन करुन शिवीगाळ करण्यात आली तसेच आम्ही मुलाला मारलं आहे, त्याला घेऊन जा असे सांगण्यात आले. पीडित मुलाच्या कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेतली, तिथे त्यांना नागेशला मारहाण सुरु असल्याचे दिसले.
कुटुंबियांनी नागेशला तातडीने रुग्णालयात नेले मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी त्याच्या कुटुंबियांनी गंभीर आरोप केले असून मुलीच्या वडिलांनी तिच्या मोबाईलवरुन नागेशला मेसेज करुन बोलावून घेतले. त्यानंतर त्याचा जीव घेण्यात आल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world