
अविनाश पवार, पुणे: पुण्यातील स्वागरेट स्थानकात 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची भयंकर घटना घडल्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. बुधवारी पहाटे साडे पाच वाजता ही भयंकर घटना घडली. अत्याचारानंतर आरोपी दत्तात्रय गाडे हा फरार झाला असून पोलीस अद्याप त्याचा शोध घेत आहेत. अशातच आता या आरोपीचे पुण्यामधील दोन बड्या नेत्यांसोबतचे राजकीय कनेक्शन समोर आले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
स्वारगेट बसस्थानकात घडलेल्या अत्याचाराच्या घटनेला 24 तास उलटून गेल्यानंतरही आरोपी दत्तात्रय गाडे अद्याप फरार आहे. पोलिसांनी आठ पथके त्याच्या शोधासाठी रवाना केली असून लवकरच तो सापडेल असा दावा गृहराज्यमंत्र्यांनी केला आहे. अशातच आता या आरोपीबाबत अनेक धक्कादायक माहिती समोर आली असून त्याचे शिरुरमधील आजी- माजी आमदारांसोबतचे फोटो समोर आले आहेत.

स्वारगेट स्थानकातील आरोपी दत्ता गाडे याच्या व्हाट्सअप प्रोफाईलला शिरुरचे विद्यमान आमदार माऊली कटके यांचा फोटो दिसून येत आहे. माऊली कटके हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आहेत. माऊली कटके यांनी त्यांच्या मतदारसंघातील नागरिकांनी तिर्थस्थळांच्या दर्शनाला नेले होते, या यात्रांचे नियोजन आरोपीने केल्याचीही धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.
तसेच तो आमदाराचा कार्यकर्ता म्हणून गावात मिरवायचा. ओला ऊबर गाडी चालवून प्रवाशांना लुबाडायचा, असे सांगण्यात येत आहे. आरोपीचे पोलिसांनी अटक केल्यानंतर पहिल्यांदा मोबाईल जप्त करायला हवेत. कारण या आरोपीने कुणासाठी उज्जैन यात्रा आयोजन केलं हे समोर यायला हवं. जनतेला कळायला हवं की यामागे कोणती राजकीय शक्ती आहे, असे आरोप माजी आमदार अशोक पवार यांनी केले आहेत. धक्कादायक म्हणजे या आरोपीचे माजी आमदार अशोक पवार यांच्यासोबतचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
दरम्यान, याबाबत आता आमदार माऊली कटके यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. मतदारसंघांतील 10 हजार पेक्षा जास्त लोकांना देवदर्शन करून मी आणलं आहे. अनेक कार्यकर्ते मतदारसंघात फिरत असताना फोटो काढत असतात. माझा संबंधित व्यक्तीसोबत फोटो असला तरी त्याचा माझा संबंध नाही. कारण अनेक कार्यकर्ते मतदारसंघात सोबत फोटो काढत असतात. माध्यमांमधे सुरू असलेल्या चर्चा चुकीच्या आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world