
Vaishnavi Hagawane Viral Video: पुण्याच्या मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण सध्या राज्यात चर्चेत आहे. वैष्णवी हगवणे या 26 वर्षीय विवाहितेने सासरच्या मंडळींकडून होणारी मारहाण आणि छळाला कंटाळून आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. एकीकडे या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत असतानाच वैष्णवीच्या लग्नातील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे जो पाहून नेटकरी भावूक झाले आहेत.
(नक्की वाचा- 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हुंडाबळी ठरलेल्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. वैष्णवी हगवणे हिचा सासरे राजेंद्र हगवणे, दीर सुशील हगवणे, पती शशांक हगवणे यांच्यासह सासू आणि नणंदेकडून मानसिक, शारिरिक छळ केला जात होता. माहेरातून पैसे आणण्यासाठी तिला मारहाण करण्यात येत होती. याच मारहाणीला, त्रासाला कंटाळून वैष्णवीने आपले आयुष्य संपवले.
वैष्णवी आणि शशांक हगवणेचा प्रेमविवाह होता. त्यांच्या शाही लग्नसोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही उपस्थिती लावली होती. अत्यंत थाटामाटात पार पडलेल्या या विवाह सोहळ्यातील अनेक फोटो, व्हिडिओ सध्या समोर येत आहेत. अशातच सध्या लग्नामध्ये वैष्णवीने पती शशांकसाठी घेतलेल्या खास उखाण्याचा व्हिडिओही समोर आला आहे.
(नक्की वाचा: Mumbai Rain Red Alert: मुंबईत कोसळधार, पाणी साचल्याने रस्ते-रेल्वे वाहतुकीवर परिणाम PHOTOS)
नववधूच्या पेहरावामध्ये नटलेल्या वैष्णवीने तिच्या लग्नात घेतलेला उखाणा ऐकून नेटकरीही भावूक झालेत. "चंदेरी थाळी, सोनेरी बटण.. शशांकरावांना आवडते चिकन आणि मटन" असा खास उखाणा वैष्णवीने घेतला होता. तिचा हाच उखाणा आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी त्यावर भावुक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
काही नेटकऱ्यांनी खूप निरागस हसते आहे ग, खूप साधी आहे तू खूप.. अशी भावुक प्रतिक्रिया दिली आहे तर काही जणांनी तु किती निरागस होतीस, तुला खरं प्रेम ओळखता आलं नाही, असे म्हणत हळहळही व्यक्त केली आहे. हे लोक इतके वाईट निघतील याची तू कल्पनाही केली नशील, असे म्हणत काही युजर्सनी संतापही व्यक्त केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world