
Pune Purandar Airport Land Acquisition Update: बहुचर्चित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पुरंदर विमानतळाच्या (Purandar International Airport) भूसंपादन प्रक्रियेने (Land Acquisition Process) आता वेग घेतला आहे. पुणे जिल्हा प्रशासनाने विमानतळासाठी आवश्यक असलेल्या सात गावांमधील १ हजार २८५ हेक्टर जागेचे ड्रोन सर्वेक्षण (Drone Survey) पूर्ण केले आहे.
7 गावातील सर्वेक्षण पुर्ण!
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सात गावांतील जमिनीचे ड्रोन सर्वेक्षण आणि मोजणीचे काम पूर्ण झाले आहे, त्यानुसार १ हजार २८५ हेक्टर (सुमारे ३ हजार एकर) जमिनीची मोजणी पूर्ण झाली आहे. मात्र, जागेची प्रत्यक्ष मोजणी प्रक्रिया (Physical Survey) अंतिम टप्प्यात असून, येत्या दोन दिवसांमध्ये ती पूर्ण होईल, असा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे.
Pune News: पुरंदर एअरपोर्ट वादात आता शरद पवारांची उडी, केलं मोठं वक्तव्य
शेतकऱ्यांना मोबदला कधी मिळणार?
या विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील एखतपूर, उदाचीवाडी, मुंजवडी, खानवडी, कुंभारवळण, खानवडी आणि पारगाव या सात गावांमधून जमीन संपादित केली जाणार आहे.एकूण १ हजार २८५ हेक्टर (तीन हजार एकर) जमीन संपादित केली जाणार आहे त्यापैकी ३ हजार २०० शेतकऱ्यांनी २ हजार ८१० एकर जागा देण्यासंदर्भात संमतिपत्रे (Consent Letters) जिल्हा प्रशासनाला दिली आहेत.
जिल्हा प्रशासनाने आता विमानतळासाठी जमीन देणाऱ्या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांसाठी देण्यात येणाऱ्या मोबदल्याचा (Compensation) प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान, हा प्रस्ताव दिवाळीनंतर त्वरित राज्य शासनाकडे (State Government) अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. या जलद गतीमुळे पुरंदर विमानतळाच्या भूसंपादन प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world