
राकेश गुडेकर, रत्नागिरी
Ratnagiri News: रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) एका व्यक्तीला व्हेल माशाची उलटी म्हणजेच अंबरग्रीस विक्री करण्याच्या तयारीत असताना अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे 2.50 कोटी रुपये किंमत असलेली 2.5 किलो वजनाची व्हेल माशाची उलटी जप्त केली आहे.
गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेला काल रात्री सुमारे 10.30 वाजता अशी माहिती मिळाली होती की, कोकणनगर येथील एजाज अहमद युसूफ मिरकर हा एमआयडीसी रत्नागिरी परिसरात व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी घेऊन येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ एमआयडीसी रत्नागिरी येथे सापळा रचला.
(नक्की वाचा- AI Affected Jobs: AI मुळे 'या' 40 क्षेत्रातील नोकऱ्यांना धोका! तुमचा जॉब सुरक्षित आहे का? वाचा संपूर्ण यादी)
आरोपीकडून 2.5 कोटींचा मुद्देमाल जप्त
रात्री 10 वाजून 45 मिनिटांनी पोलिसांनी छापा टाकून आरोपी एजाज मिरकर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे व्हेल माशाची उलटी बाळगण्यासाठी कोणतीही अधिकृत परवानगी नव्हती. पोलिसांनी त्याच्याकडून विक्रीच्या उद्देशाने आणलेली 2.5 किलो वजनाची अंबरग्रीस जप्त केली, ज्याची किंमत अंदाजे 2.50 कोटी रुपये आहे. या कारवाईत पोलिसांनी 50 हजार रुपये किंमतीची एक मोटारसायकल देखील जप्त केली आहे.
(नक्की वाचा- Kangana Ranaut: कंगनाने Insta पोस्ट शेअर करत म्हटलं 'लज्जास्पद'; परदेशी नागरिकाचा 'तो' VIDEO व्हायरल)
आरोपी एजाज मिरकर याच्याविरोधात रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 च्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. अंबरग्रीसचा वापर परफ्यूम आणि औषध उद्योगात केला जातो, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात त्याला मोठी मागणी आहे. यामुळे अशा तस्करीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world