![राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, प्रतिलिटर मिळणार 'इतका' भाव राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, प्रतिलिटर मिळणार 'इतका' भाव](https://c.ndtvimg.com/2023-09/q0r83q8g_milk_625x300_28_September_23.jpg?im=FaceCrop,algorithm=dnn,width=773,height=435)
आंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटी आणि बटरचे दर कमी झाल्याने राज्यातील दूध खरेदी दरावर परिणाम झाला होता. यामुळे दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आले होते. दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी दुधाला प्रतिलिटर 30 रुपये स्थायीभाव आणि शासनाकडून 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. दुधाचे नवीन दर 1 जुलै पासून लागू होतील. याबाबतचे निवेदन पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत केले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राज्यभरातील सहकारी आणि खासगी दूध उत्पादक संघ,आणि दूध उत्पादक शेतकरी यांची तातडीची बैठक घेण्यात आली. त्यात विखे पाटील यांनी दूध उत्पादक शेतकरी, दूध संघाच्या समस्या जाणून घेतल्या. राज्यातील सर्व खासगी आणि सहकारी दूध संघाने शेतकऱ्यांना प्रतिलिटर 30 रूपये भाव देण्याचे सर्वानुमते ठरले. तसेच सरकारकडून शेतकऱ्यास 5 रुपये प्रतिलिटरचे अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करेल. त्यामुळे शेतकऱ्याला प्रतिलिटर 35 रुपये मिळून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल,असे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
ट्रेंडिंग बातमी - लाडकी बहीण योजनेत झाला मोठा बदल, आता 'या' महीलांनाही मिळणार लाभ
मागील काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडर आणि बटरची मागणी कमी झाल्याने त्यांचे दर घसरत आहेत. यामुळे राज्यात दूध पावडरचा मोठा साठा शिल्लक आहे. म्हणून राज्यातील जे दूध प्रकल्प भुकटी निर्यात करतात त्यांना प्रोत्साहन म्हणून प्रतिकिलोसाठी 30 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. ही अनुदानाची मर्यादा 15 हजार मॅट्रिक टनाकरिता असणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world