
सरकारी अधिकारी, कर्मचारी हे जनतेचे सेवक असतात. मात्र अनेकदा तक्रारी, समस्या घेऊन आलेल्या सर्वसामान्यांना काही अधिकारी, कर्मचारी जी वागणूक देतात ती पाहिल्यानंतर जनता ही यांची गुलाम आहे का असा प्रश्न पडू लागतो. सेवेतून निवृत्त झाल्यानंतरही काही अधिकाऱ्यांमधील मग्रुरी जात नाही. माजी सनदी अधिकारी दिलीप शिंदे यांच्यावरही अशाच प्रकारचा आरोप होत आहे. दिलीप शिंदे हे सध्या सेवेतून निवृत्त झाले आहे मात्र ते सध्या सेवा हमी विभागीय आयुक्त म्हणून काम पाहात आहेत. निवृत्त झाले असले तरी शिंदे हे आपण आजही IAS ऑफिसर आहोत असे सांगत लोकांना दम देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला जात आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडीओ
पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी एक व्हिडीओ X वर पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटलंय की,"हे गृहस्थ चुकीच्या ठिकाणी गाडी लावून आपण आयएएस असल्याचे सांगत हुज्जत घालत आहेत.यांच्या गाडीत पिवळा दिवाही दिसत आहे,कशासाठी आणि कोणत्या अधिकारात?." कुंभार यांनी पुढे म्हटले आहे की, 'हे निवृत्त आयएएस दिलीप शिंदे आहेत.राजकारण्यांचे लांगूलचालन करणाऱ्या सेवकांना निवृत्तीनंतर बक्षीसी म्हणून एखादं पद दिलं जातं.त्यातलेच हे एक.निवृत्तीनंतर एवढा माज असेल तर सेवेत असत्ताना काय केले असेल? महाराष्ट्रातील सेवा हमी आयुक्तांच्या एकूणच कामगिरीचा आढावा घेतला तर त्यावर होणारा खर्च आणि होणारं काम याचं प्रमाण विसंगत असल्याचं दिसत.'
विजय कुंभार यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटलंय की, "आयएएस सेवेचं पीक अलीकडे नाही तर फार पूर्वी बिघडलंय.पूजा खेडकर एकटी नाही.अशा अधिकाऱ्यांकडून कोणत्या सेवेची अपेक्षा करायची आणि यांच्यावर कारवाई कोण करणार?"
नक्की वाचा: टीव्ही मालिकेतील भरमसाठ जाहिरातींवर आजी भडकल्या; खासदार सुप्रिया सुळेंकडे केली 'अजब' मागणी
दिलीप शिंदे आणि पोलीस कर्मचाऱ्यातील संवाद काय होता ?
दिलीप शिंदे- NCPAचे आहात तुम्ही ?
NCPA कर्मचारी- हो
दिलीप शिंदे- तुम्ही NCPA कंपाऊंडच्या आतमध्ये असाल.
NCPA कर्मचाऱ्याचा सहकारी- मी त्यांना सांगितलं की गेटच्या समोर गाडी नका लावू, तर ते म्हणतात तुम्ही आम्हाला शिकवू नका. वर बोलतात अधिकारी आहे मी.
दिलीप शिंदे- मी इथे बसलोय, गव्ह्र्नमेंटची गाडी आहे
पोलीस- घ्या ना बाजूला गाडी
दिलीप शिंदे ( निवृत्त सरकारी अधिकारी)- आपण कोण ?
पोलीस- (युनिफॉर्मकडे हात दाखवत) दिसत नाही का मी कोण आहे ते?
दिलीप शिंदे -कोणत्या पोलीस स्टेशनचे
पोलीस- याच पोलीस स्टेशनचा
दिलीप शिंदे - मी IAS ऑफिसर आहे नीट बोला
दिलीप शिंदे- कमिश्नर आहे मी नीट बोला
दिलीप शिंदे- (आयडी कार्ड दाखवत पोलिसाला विचारताना) तुम्ही कोण आहात, तुमचं काय काम आहे इथे ?
पोलीस - मी याच पोलीस चौकीचा आहे
दिलीप शिंदे- ही पद्धत नाहीये बोलायची.
NCPA कर्मचारी- आम्हीही प्रेमानेच बोलतोय साहेब
दिलीप शिंदे- मला इतकी अक्कल आहे ना, मी बसलोय गाडीत. कोणाला डिस्टर्ब झालं तर काढेन ना मी गाडी.
मी आयएएस अधिकारी आहे.
— Vijay Kumbhar (@VijayKumbhar62) October 6, 2025
हे गृहस्थ चुकीच्या ठिकाणी गाडी लावून आपण आयएएस असल्याचे सांगत हुज्जत घालत आहेत.यांच्या गाडीत पिवळा दिवाही दिसत आहे,कशासाठी आणि कोणत्या अधिकारात?.हे निवृत्त आयएएस दिलीप शिंदे आहेत.
राजकारण्यांचे लांगूलचालन करणाऱ्या सेवकांना निवृत्तीनंतर बक्षीसी म्हणून एखादं… pic.twitter.com/gkewRv5xcw
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world