जाहिरात
This Article is From Jul 04, 2024

संत तुकाराम महाराजांची पालखी अडवली, सरपंच-उपसरपंचासह ग्रामस्थांवर गुन्हे दाखल

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या उरुळीकांचन विसाव्यादरम्यान पालखी नियोजनावरून सोहळ्याचे विश्वस्त आणि ग्रामस्थ यांच्यात वाद झाला आहे.

संत तुकाराम महाराजांची पालखी अडवली, सरपंच-उपसरपंचासह ग्रामस्थांवर गुन्हे दाखल
पुणे:

राहुल कुलकर्णी, प्रतिनिधी

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची (Palkhi of Sant Tukaram Maharaj) पालखी अडवल्याप्रकरणी ग्रामस्थांवर कारवाई करण्यात आली आहे. सरपंच आणि उपसरपंचासह अनेक ग्रामस्थांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. सरपंच अमित कांचन, माजी सरपंच भाऊसाहेब कांचन, अलंकार कांचन, संतोष उर्फ पप्पू कांचन, प्रताप कांचन, राजेंद्र कांचन यांच्यासह 15 ते 20 पदाधिकारी व ग्रामस्थांवर पुण्यातील उरुळीकांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्या अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या उरुळीकांचन विसाव्यादरम्यान पालखी नियोजनावरून सोहळ्याचे विश्वस्त आणि ग्रामस्थ यांच्यात वाद झाला होता. यावेळी सोहळ्यातील नगारा बैलगाडा अडविण्याचा प्रयत्न ग्रामस्थांनी केला होता. या प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

काय आहे वाद?
उरुळी कांचन येथील दुपारच्या विसाव्याची परंपरा मोडीत काढून तुकाराम महाराजांची पालखी थेट यवतच्या दिशेने रवाना झाली होती. 60 वर्षाची परंपरा मोडल्याचा ग्रामस्थांकडून आक्षेप घेण्यात आला होता. यापूर्वी 1997 सालीही असाच वाद झाला होता. त्यावेळी रामकृष्ण मोरे यांनी वाद मिटवला होता. सध्या हा वाद मिटला असला तरी परंपरा का मोडली, यावरून दावे प्रतिदावे केले जात आहे. 

नक्की वाचा - माऊलीसाठीची भक्ती अशी झाली पूर्ण; नातवाच्या खांद्यावर आजीची पंढरीची वारी!

नेमकं काय घडलं?
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा कदम वस्ती येथे 2 जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मुक्कामी पोहोचला होता. मुक्काम आटोपल्यानंतर पालखी सोहळा लोणी काळभोर आणि कदमवाकवस्ती ग्रामस्थांचा निरोप घेऊन 2 जुलै रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाला. थेऊरफाटा, कुंजीरवाडी, नायगाव फाटा, सोरतापवाडी, इनामदार वस्ती येथील ग्रामस्थांच्या शुभेच्छा घेत पालखी सोहळा उरुळी कांचन येथे दुपारी सव्वा एक येथील विसाव्याला न थांबता थेट यवतच्या दिशेने मार्गस्थ झाली. 

त्यामुळे उरुळी कांचन येथे पालखी सोहळा पोहचल्यानंतर ग्रामस्थांनी महामार्गावरच थांबून पालखी सोहळ्याचा नगारा अडविला. दुपारचा विसावा हा परंपरेनुसार ग्रामदैवत काळभैरवनाथ मंदिरात करावा, यावरून पालखी सोहळ्याचे प्रमुख आणि ग्रामस्थांमध्ये वाद झाला. उरुळी कांचन ग्रामस्थ पालखी गावात नेण्यासाठी आक्रमक होते. तेव्हा पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी ग्रामस्थांची समजूत काढली. 25 गावातल्या लोकांना दर्शन झाले नाही. पालखी येथे न थांबल्याने एक लाख नागरिकांना दर्शन घेता आले नाही, असा दावा उरळी कांचनच्या सरपंचानी केला आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com