Satara Doctor Suicide Case: सातारा जिल्ह्यातील फलटण शहरामध्ये सरकारी रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडालीय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मृत महिला डॉक्टरांच्या कुटुंबीयांशी गुरुवारी (30 ऑक्टोबर) फोनवरुन बातचित केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काय आश्वासन दिले?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलेल्या विधानाचे समर्थन करत नसल्याचे सांगितले. तसेच आयोगाचे विचार आमच्या पक्षाची भूमिका दर्शवत नाहीत, असेही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केले. या प्रकरणात दोषी असणाऱ्यांना सोडले जाणार नाही. मी तुम्हाला लवकरच भेटेन, असेही आश्वासन उपमुख्यमंत्री पवार यांनी कुटुंबीयांना दिलंय.
शिवसेनेच्या (उबाठा) उपनेत्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार) प्रवक्त्या रुपाली ठोंबरे आणि काँग्रेसच्या नेत्या संगीता तिवारी यांनी गुरुवारी (30 ऑक्टोबर 2025) पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावेळेस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कुटुंबीयांशी संवाद साधला.
रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढल्या?
दुसरीकडे सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर 27 ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळेस त्यांनी महिला डॉक्टरांच्या कॉल रेकॉर्डची माहिती सांगितली होती. चाकणकरांच्या या कृत्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही याबाबत नाराजी व्यक्त करत त्यांच्या भूमिकेशी असहमत असल्याचे सांगितलंय.
(नक्की वाचा: Satara Doctor Suicide Case: कारवाई केली नाही तर... सातारा महिला डॉक्टर प्रकरणी महिला नेत्याचा मोठा इशारा)
सातारा महिला डॉक्टरने आत्महत्या प्रकरण
साताऱ्यातील फलटण शहरातील एका हॉटेलमध्ये सरकारी रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या महिला डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केली. 23 ऑक्टोबर रोजी हॉटेलच्या रुममध्ये त्या गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्या होत्या. त्यांच्या तळहातावर सुसाइड नोटही आढळली होती. या सुसाइड नोटमध्ये त्यांनी सॉफ्टवेअर इंजिनिअर प्रशांत बनकर आणि निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदनेच्या नावाचा उल्लेख केला होता. प्रशांत बनकरवर त्यांनी मानसिक छळाचा तर बदनेवर बलात्काराचा आरोप केलाय. या प्रकरणी दोघांनाही अटक करण्यात आलीय.
(नक्की वाचा: Satara Doctor Suicide Case: महिला डॉक्टरचे हॉटेलमधील CCTV फुटेज, विनंती, रुम नंबर 114 व 17 तासांचे रहस्य; मालक म्हणाला...)
(Content Source: PTI)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

