सागर कुलकर्णी, राहुल कुलकर्णी, पुणे: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सभा आणि तुतारीचीच सर्वाधिक चर्चा आहे. मी काय म्हातारा झालोय का? राज्यामध्ये सत्ता बदल केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असं म्हणत शरद पवार अख्खा महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. दुसरीकडे शरद पवार यांची ही शेवटची निवडणूक असल्याचं त्यांचे विरोधक म्हणतायेत. विरोधकांच्या या टिकेला आता शरद पवार यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. एनडीटीव्ही मराठीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी विविध विषयांवरील रोखठोक प्रश्रांना सडेतोड उत्तरे दिली. नेमकं काय म्हणाले शरद पवार? वाचा ही स्फोटक मुलाखत..
1. तुम्ही शतायुषी व्हावं अशी महाराष्ट्रातील प्रत्येकाची इच्छा आहे, मात्र काही जणांच्या मते ही तुमची शेवटची निवडणूक?
'जोपर्यंत मी काम करु शकतो, हिंडू शकतो फिरू शकतो तोपर्यंत मी करत राहणार. मी आता निवडणुकीला उभे राहणार नाही. मी 1967 साली पहिली निवडणूक लढलो. तेव्हापासून आजपर्यंत मी कुठे ना कुठे हाऊसमध्ये आहे. विधानसभा, कधी विधानपरिषद, लोकसभा राज्यसभा. गेली ५६ वर्ष
मी संसदीय राजकारणात आहे. या काळात मी एकही दिवस ब्रेक घेतला नाही. महाराष्ट्रामध्ये असा दुसरा नेता कोणी असेल मला माहित नाही, पण मी आहे. आता मी डायरेक्ट निवडणुकीला उभा राहणार नाही, असा निर्णय २०१४ घेतला. त्या दृष्टीने मी काम करेन.याचा अर्थ मी पक्षाच्या कामातून, राजकारणातून घरी बसलो. असे नाही. मी काम करत राहणार आहे.' असं शरद पवार म्हणाले.
2. बारामतीत मी सुद्धा काम केले, अजित पवारांचा दावा..
'आम्ही एकत्र असताना निर्णय घेतला होता. मी लोकसभेला गेल्यानंतर मी दिल्लीला जाणार आणि महाराष्ट्रातले बारामतीततले काम अजित पाहणार. इथे २० वर्षात या संस्थांमध्ये एकही नियुक्ती मी केलेली नाही.आता तिथल्या सगळे कारखाने त्यांच्याकडे आहेत. फक्त शैक्षणिक संस्था आणि शेतीसंबंधी संस्था माझ्याकडे आहेत. जो विचार आम्ही स्विकारला त्यात तेही होते. ज्यामधून आम्ही भाजपसोबत संघर्ष केला. आज त्यांनी आमचा नेहमीचा विचार सोडून दुसऱ्या रस्त्याला गेले. तो विचार आम्हाला मान्य नाही. लोकसभेला त्यांनी वेगळा विचार घेतला, सुप्रिया सुळे तिनदा निवडून आलेली,तिचे संसदीय काम चांगले आहे. त्या निवडणुकीत ज्या विचाराशी आम्ही भांडलो, त्यांना घेऊन आमच्याविरोधात काम केले. आम्हाला ती भूमिका अजिबात मान्य नाही. तुम्ही वेगळी भूमिका घेतली, आम्हालाही घ्यावा लागेल,' असं शरद पवार म्हणाले.
3. दिलीप वळसे पाटलांविरोधात थेट भूमिका का घेतली?
' दिलीप वळसे पाटील यांचे वडील जिवाभावाशी सहकारी होते, माझ्यासाठी वाटेल ते करणारे होते. त्यांची सुरुवात माझ्या व्यक्तिगत स्टाफपासून झाली. कुटुंबाच्या व्यक्तीसारखी त्यांच्यासाठी मेहनत घेतली, अनेक पदे दिली. वसंतदादा इन्टिट्युट, रयत शिक्षण संस्था अशा महत्वाच्या संस्थांवर घेतले.असे केल्यानंतर ज्या विचाराशी भांडून तुम्ही निवडणूका केल्या त्या विचाराला सोडून टोकाची भूमिका घेता याचा अर्थ तुम्ही मतदारांची फसवणूक करता. त्यामुळे त्यांच्याविरोधात अशी भूमिका घ्यावीच लागेल,,' असं शरद पवार म्हणाले.
4. मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक न लढण्याची भूमिका मराठा आरक्षणाबद्दल मत काय?
'जरांगे पाटलांनी मराठा समाजासाठी लढा दिला, त्याला लोकांचा पाठिंबा आहे. कारण मराठा समाजाचा मोठा वर्ग शेतकरी आहे. त्यांची मुले शिकत आहेत. त्यामुळे काहीतरी केलं पाहिजे, याबाबत अस्वस्थता आहे. जरांगे पाटील ही भूमिका मांडत आहेत. एक गोष्ट जरांगेंनी वेगळी केली ती म्हणजे मराठासोबत मुस्लिम, धनगर,लिंगायत यांच्यासाठीही आग्रह धरला.यावर एकच उपाय आहे, सगळ्यांना विचारात घ्या. सर्वांच्या हिताची जपणूक आहे. मराठा समाजात शेती करणारा वर्ग आहे.जरांगेनी निवडणूक लढण्याची न भूमिका घेतली ती योग्य आहे, असं शरद पवार म्हणाले.
5. सुप्रिया सुळे मुख्यमंत्री? मविआचा CM पदाचा फॉर्म्युला काय?
'राज्याला महिला मुख्यमंत्री मिळाली तर आनंद आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे सुप्रियाला त्यामध्ये सर नाही, तिला संसदीय राजकारणात रस आहे. तुम्ही चौकशी करा. तसेच स्वच्छ शब्दांमध्ये सांगतो ज्यांचे आमदार जास्त निवडून येतील त्यांचा मुख्यमंत्री होईल इतरांनी त्याला पाठिंबा द्यावा', असे म्हणत शरद पवार यांनी बहुमत मिळाल्यास मविआचा मुख्यमंत्री हा मेरिटवर ठरेल,' असे स्पष्ट केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world