जाहिरात

Shirdi News: शिर्डी विमानतळाला आता बूस्टर डोस! 9 वर्षांचा खोळंबा संपणार? 'या' सुविधा गेमचेंजर ठरणार

नऊ वर्षे उलटूनही कार्गो सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक पायाभूत तयारी झालीच नाही.

Shirdi News: शिर्डी विमानतळाला आता बूस्टर डोस! 9 वर्षांचा खोळंबा संपणार? 'या' सुविधा गेमचेंजर ठरणार
  • शिर्डी विमानतळाचा विकास नऊ वर्षांत अपेक्षेप्रमाणे झाला नाही.
  • निधीतून एकात्मिक टर्मिनल बिल्डिंग, आणि एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवरसाठी आवश्यक उपकरणे उभारली जाणार आहेत
  • सद्यस्थितीत शिर्डी विमानतळावर केवळ पाच उड्डाणे चालू आहेत.
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
शिर्डी:

सुनिल दवंगे

देश-विदेशातील साईभक्तांसाठी आणि उत्तर महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी शिर्डी विमानतळ खरे आर्थिक व पर्यटन वरदान ठरू शकते. मात्र गेल्या नऊ वर्षांत सेवा-सुविधांच्या उभारणीबाबत हे विमानतळ अपेक्षेप्रमाणे झेप घेऊ शकले नाही. त्यामुळे एकेकाळी गगनभरारी घेण्याची क्षमता असलेले हे विमानतळ विकासाच्या उंबरठ्यावरच अडकून पडले होते. आज राज्य सरकारने 136 कोटी रुपयांच्या बूस्टर डोसने या विमानतळाचा विकास मार्गी लावण्याचा निर्णय घेतला आहे. या निधीतून एकात्मिक टर्मिनल बिल्डिंग, अॅप्रॉन (पार्किंग) विस्तार, तसेच एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवरसाठी आवश्यक यंत्रसामग्री उभारण्याचे काम गतीमान होणार आहे. यानंतर हे विमानतळ खऱ्या अर्थाने कात टाकून नव्या रूपात साईनगरच्या विकासाचा नवा अध्याय उघडू शकते.

नऊ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या विमानतळाने सुरुवातीलाच शेजारच्या संभाजीनगर विमानतळावर आघाडी घेतली होती. काही वर्षांतच येथून तब्बल सोळा उड्डाणे सुरू होती. मात्र सुविधांचा अभाव आणि दुर्लक्षित पायाभूत सुविधा यांमुळे ही संख्या घटत जाऊन आज केवळ सहा फ्लाइट्स उरल्या आहेत. टर्मिनल बिल्डिंग कोणत्याही विमानतळाचा हृदयस्थानी असणारा भाग असतो. पण उद्घाटनाच्या घाईत आणि निधीअभावी येथे पत्र्याच्या तात्पुरत्या शेडमध्ये टर्मिनल कार्यान्वित करण्यात आले. हीच सर्वात मोठी चूक ठरली. आता उपलब्ध झालेल्या निधीतून मंदिर वास्तुकलेची अनुभूती देणारे सुंदर, भव्य आणि आधुनिक टर्मिनल उभारले जाणार आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण झाला तर शिर्डी विमानतळाचा चेहरामोहरा बदलून जाईल.

नक्की वाचा - Pune News: शासकीय होस्टेलमध्ये राहाणाऱ्या तरुणींना प्रेग्नंसी टेस्ट का करावी लागते? धक्कादायक वास्तव आलं समोर

एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवरचे बांधकाम पूर्णत्वाच्या जवळ आहे. परंतु अत्यावश्यक यंत्रणा आणि उपकरणे नसल्यामुळे ते वापरात आणता येत नव्हते. नव्या निधीतून ही उणीवही भरून निघणार आहे. ज्यामुळे उड्डाणांची चळवळ आणखी सुरळीत आणि सुरक्षित होणार आहे. पार्किंगची सुविधा जरी असली तरी बिझनेस क्लास लाऊंजचा अभाव हा एक गंभीर प्रश्न होता. येणारी नवी टर्मिनल इमारत ही कमतरता भरून काढेल. आजवर राज्य सरकारने या विमानतळावर 450 कोटी रुपये खर्च केले असून, त्यात आजच्या निधीची भर पडली आहे.

नक्की वाचा - Pune News: इंद्रायणीत मृत माशांचा खच! आळंदीकर संतप्त, 'माणसं मरायची वाट पाहणार का?'

उड्डाणांची सद्यस्थिती व बिझनेस लाऊंजची गरज
सध्या शिर्डी विमानतळावरून केवळ पाच उड्डाणे सुरू आहेत. एअर इंडिया (टाटा)ने येथून दिल्लीसाठी दोन एअरबस फ्लाइट्स चालवण्याची मागणी केली असून DGCA ने त्यास मंजुरीही दिली आहे. परंतु बिझनेस क्लाससाठी आवश्यक लाऊंजची सुविधा नसणे ही मोठी अडचण कंपनीसमोर उभी राहिली आहे. एअरबसमध्ये 20 बिझनेस व 180 इकोनॉमी आसने असतात. फक्त 20 बिझनेस आसनांचे उत्पन्न 180 आसनांच्या उत्पन्नाइतके असते. त्यामुळे लाऊंजचे महत्व किती प्रचंड आहे हे स्पष्ट होते.

नाईट लॅण्डिंग सुविधा 
शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा आता संपूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. विमानांची संख्या वाढवण्यासाठी हा मोठा टप्पा असला तरी ही सुविधा मिळण्यासाठी तब्बल सात-आठ वर्षे वाया गेली. हीच सर्वात मोठी खंत आहे.

नवीन फ्लाइट्स आकासाची वाट पाहत
आकासा एअरने बंगलोर आणि गोवा मार्गांसाठी दोन फ्लाइट्सची मागणी केली आहे. मंजुरी अद्याप मिळालेली नसली, तरी एअर इंडिया आणि आकासा या दोन्ही कंपन्यांची सेवा सुरू झाल्यास शिर्डी विमानतळावरून होणाऱ्या उड्डाणांची संख्या 10 वर जाण्याची शक्यता आहे.

कार्गो सेवा नऊ वर्षांतही प्रगती नाही
नऊ वर्षे उलटूनही कार्गो सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक पायाभूत तयारी झालीच नाही. ही सेवा उभारली गेली असती तर अहिल्यानगर आणि उत्तर महाराष्ट्रातील उद्योग, शेतकरी, व्यापारी यांना मोठा दिलासा मिळू शकला असता. कार्गो टर्मिनल नसणे हे या विमानतळाचे आजही ‘अपुऱ्या क्षमतेचे' निदर्शक आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com