अंबरनाथ नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीने (Ambernath Vice President Election) संपूर्ण ठाणे जिल्ह्याचे राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. आज होणाऱ्या या उपनगराध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीसाठी अंबरनाथ विकास आघाडीने (Ambernath Vikas Aghadi) आपल्या सर्व नगरसेवकांना 'व्हीप' (Election Whip Issued) जारी केला असून, आदेश झुगारणाऱ्यांवर अपात्रतेची कारवाई करण्याचा थेट इशारा दिला आहे. या निवडणुकीत विशेषतः अजित पवार गटाच्या (Ajit Pawar Group Corporators) चार नगरसेवकांच्या भूमिकेकडे लक्ष लागले असून, त्यांच्या एका निर्णयामुळे सत्तेचे पारडे फिरू शकते.
नक्की वाचा: अंबरनाथमध्ये भाजपला धोबीपछाड! अजित पवार गटालाही धक्का, शिंदेंची स्मार्ट खेळी, किती नगरसेवक फोडले?
हायव्होल्टेज ड्रामा आणि 'व्हीप'चे अस्त्र
अंबरनाथ नगरपरिषदेच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ विकास आघाडीचे गटनेते अभिजीत करंजुले यांनी रविवारी सर्व नगरसेवकांसह पत्रकार परिषद घेतली आणि थेट इशारा दिला की, "आम्ही आमच्या गटातील सर्व 31 नगरसेवकांना अधिकृत व्हीप बजावला आहे. जर कोणीही या आदेशाच्या विरोधात जाऊन मतदान केले, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी आम्ही पावले उचलू,"
नक्की वाचा: BMC Election 2026: मतदान केल्यास होणार मोठा फायदा, ऑफर अजिबात चुकवू नका
अंबरनाथ नगरपरिषदेमध्ये नेमके समीकरण काय आहे?
अंबरनाथ नगरपरिषदेमध्ये एकूण 59 नगरसेवक आहेत. या नगरपरिषदेसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे 12 नगरसेवक निवडून आले होते. भाजपने आपले संख्याबळ वाढवण्यासाठी आणि एकनाथ शिंदे यांच्या राजकीय वर्चस्वाला हादरा देण्यासाठी काँग्रेससोबत युती केली होती, ज्याची संपूर्ण देशभर चर्चा झाली होती. काँग्रेसने भाजपला साथ देणाऱ्या 12 नगरसेवकांना निलंबित केलं होतं. या नगरसेवकांचा निलंबनानंतर अवघ्या काही तासात भाजपमध्ये प्रवेश झाला होता. त्यामुळे भाजपचे स्वबळावर असलेले 14, काँग्रेसमधून आलेले 12, राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 आणि 1 अपक्ष अशा एकूण 31 जणांचा मिळून 'अंबरनाथ विकास आघाडी' नावाचा एक गट जिल्हाधिकाऱ्यांकडे रीतसर नोंदवण्यात आला होता. या आघाडीकडे बहुमताचा आकडा (30+) स्पष्ट असतानाच तीन दिवसांपूर्वी आणखी एक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाली. या गटातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) चार नगरसेवकांनी अचानक शिवसेना शिंदे गटाला आपला पाठिंबा जाहीर केला. अंबरनाथमध्ये शिवसेनेचे आधीच 27 नगरसेवक आहेत, त्यामुळे या चार नगरसेवकांच्या जोरावर शिंदे गटाचे पारडे जड झाले होते. मात्र, आता आघाडीने 'व्हीप' काढल्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या या नगरसेवकांसमोर कायदेशीर पेच निर्माण झाला आहे.
अंबरनाथ उप नगराध्यक्षपदासाठी कोणाला मिळणार संधी?
अंबरनाथ विकास आघाडीच्या वतीने उपनगराध्यक्ष पदासाठी प्रदीप पाटील हे अधिकृत उमेदवार असणार आहेत. दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटाकडून रुपाली गेजगे किंवा माजी नगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. आजच्या या निवडणुकीसाठी भाजपचे नेते आकिसन कथोरे स्वतः मैदानात उतरले असून, त्यांच्या उपस्थितीत ही निवडणूक पार पडणार आहे. शिंदे गटाने दावा केला होता की त्यांचे पारडे जड आहे, पण व्हीपच्या अस्त्रामुळे आता पुन्हा एकदा भाजप आणि विकास आघाडीचे पारडे वरचढ ठरताना दिसत आहे.