जाहिरात

भाजपकडे 100 जागा मागा, एकनाथ शिंदेंसमोर रामदास कदमांची मागणी

खुळं पोरगंही सांगेल की उबाठा काँग्रेसच्या वोट बँकेमुळे जिंकली आहे. सत्तेसाठी विचार सोडणारे हे लाचार आहे. काँग्रेसने बाळासाहेबांच्या मतदानाचा अधिकार काढून घेतला होता. आज काँग्रेसला मतदान करताना उबाठाचे हात थरथरले कसे नाही, असा सवाल एकनाथ शिंदे यांनी विचारला.

भाजपकडे 100 जागा मागा, एकनाथ शिंदेंसमोर रामदास कदमांची मागणी
मुंबई:

शिवसेनेचा 58 वा वर्धापन दिन आज साजरा करण्यात आला. शिवसेनेने (शिंदे गट) वर्धापन दिनाचा कार्यक्रम वरळीतील NSCI डोममध्ये आयोजित केला होता. वरळी हा शिवसेना (उबाठा) आमदार आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. त्यांच्या मतदारसंघातच शिवसेनेने वर्धापन दिनाच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन केले. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या मंचावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेजारी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचाही फोटो होता.  शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या फोटोंसह डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असण्याची ही बहुधा पहिलीच वेळ होती.  विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवत जातीय समीकरणे जुळवण्यासाठी शिवसेनेने (शिंदे गट) हे पाऊल उचलले असावे अशी चर्चा आहे. 

या वर्धापन दिनानिमित्त बोलत असताना शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, " वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत असताना मला एक वेगळा आनंद आहे. 1966 साली शिवसेना बाळासाहेबांनी स्थापन केली. मराठी माणसाचा न्याय हक्क हे करत असताना शिवसेनेची भूमिका व्यापक होत गेली. शिवसेना देशभर हिंदुत्वाचा गौरव करणारी संघटना म्हणून लोकप्रिय झाली. आज शिवसेना वर्धापन दिन आहे. शिवसेना ठाणे, कोकण, संभाजीनरासह महाराष्ट्रात वाढली. हे सगळे शिवसेनेचे बालेकिल्ले आहेत. ते बालेकिल्ले आपण शाबूत राखले. ठाणे, कल्याणमध्ये 2 लाखांपेक्षा अधिकच्या मतांनी जिंकलो. संभाजीनगर जिंकले, कोकणात एकही जागा उबाठाला मिळू शकली नाही. हा विजय घासून पुसून नाही तर ठासून मिळवलेला आहे.  २ वर्षांपूर्वी केलेल्या उठावावर जनतेने शिक्कामोर्तब केलंय.  जनतेच्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही."

"बाळासाहेबांचा वारसा सांगणाऱ्यांना हिंदू म्हणवताना लाज वाटू लागली आहे. त्यांना हिंदुत्वाची अॅलर्जी झाली आहे. शिवतीर्थावर भाषण करताना ते हिंदू-बांधव भगिनी म्हणाले नाही. आजच्या वर्धापन दिनाच्या भाषणातही ते तमाम हिंदू-बांधव भगिनी मातांनो बोलण्याचे धाडस त्यांनी केले नाही. कुठे गेले तुमचे हिंदुत्व ? बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार तुम्हाला राहिलेला नाही. बाळासाहेबांचा फोटो लावून मते मागण्याचा अधिकार तुम्हाला राहिलेला नाही. आपण तीन-चार जागा नक्की जिंकलो असतो, मात्र आपण जागा का हरलो ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. .मागचे सगळे विसरून महायुती आपल्याला ताकदीने पुढे न्यायची आहे." असे शिंदेंनी म्हटले.

शिंदे यांच्या भाषणातील प्रमुख हे मुद्दे खालील प्रमाणे आहेत

"धारावी, ट्रॉम्बेमध्ये राहुल शेवाळेंचा लीड गेला. १ टक्का मते आपल्याला आणि ९९ टक्के मतदान त्यांना. इथे कुठला मोबाईल लावून त्यांनी ईव्हीएम हॅक केलं होतं? ही कुठली लोकशाही. आता आम्हीही ईव्हीएमवर संशय घ्यायचा का ? तुम्ही जिंकला की ईव्हीएम चांगले नाहीतर वाईट. ईव्हीएम हॅक करता आला असता तर यामिनी जाधव आणि राहुल शेवाळे दोघेही जिंकले असते. वायकरांचा विजय त्यांच्या फार जिव्हारी लागला आहे. आम्ही जिंकलेलो असताना वायकर यांना हरवण्याचे काम करत असताना मी डोळे बंद करून पाहात राहू का ? वायकरांचा विजय हा जनतेचा विजय आहे, मेरीटवर मिळालेला विजय आहे. कुठेही जा, कधीही जा हा विजय जनतेने दिलेला विजय आहे. हा शिवसेनेचा विजय आहे. नियती कोणालाही सोडत नाही, कोणालाही माफ करत नाही. उबाठा हा खोटारड्यांचा पक्ष आहे. खोटं बोलायचं आणि रडत बसायचं. 

ओवेसीपेक्षा उबाठा हा त्यांना आपला मसीहा वाटू लागले आहेत. वरळीत जेमतेम ६ हजारांचा लीड घेतलाय. काही म्हणत होते की इथे आम्ही ५० हजारांचा लीड घेणार . एक म्हणत होते इथून लढतो, तिथून लढतो. याला पाडतो त्याला पाडतो. आता कसे जिंकणार? तुम्हाला भेंडी बाजारसारखा मतदारसंघ शोधावा लागेल. मतदारसंघात नाही पत आणि माझे नाव गणपत अशी अवस्था झाली आहे. हिंदूच हिंदूंचे शत्रू होणार नाही याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे.  आम्ही देशभक्त मुसलमानांच्या विरोधात कधीही नाही. उबाठा चायनीज छत्रीसारखी आहे, ज्यांची काहीच गॅरेंटी नाही. आज इधर कल उधर परसो और किधर. सत्तेसाठी ते काहीही करू शकतात.   

रामदासभाई म्हणाले की आपल्याला तालुका-तालुका गावागावात जावे लागेल, हे खरे आहे. खोटा नरेटीव्ह पसरवण्यासाठी  ती मंडळी फिरत होती. संविधान खतरे मे है अशी अफवा पसरवली. नेता घरात नाही लोकांच्या दारात चांगला दिसतो. मतदार यादीत कमी झालेली नावे यादीत पुन्हा नोंदवा. आपली कामे लोकापर्यंत पोहोचवा. विरोधकांच्या खोट्या प्रचाराची दुर्गंधी लगेच पसरते, विकासाचा सुगंध हा आपल्यालाच पोहचवावा लागेल.  राज्यात महायुतीचे सरकार आल्याशिवाय राहणार नाही. त्यांची सूज उतरवण्यासाठी यांना हिंदुत्वाचा झेंडू बाम लावायची वेळ आली आहे.  

एकनाथ शिंदे यांनी पुढे म्हटले की ,"ही तात्पुरती आलेली सूज आहे, ती काही दिवसांनी उतरते. एकनाथ शिंदे संपणार, शिवसेना संपणार असे काहीजण बरळत होते, मात्र या राज्यातील मतदारांनी त्यांचे दात घशात घातले.  हा एकनाथ शिंदे संपणार नाही, संपला नाही. तो जिंकला तो तुमच्या साथीने. यापुढेही एकनाथ शिंदे जिंकत राहील. एकनाथ शिंदे घाबरणार नाही, भीती हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.  काही जण म्हणत होते की ठाणे हातचे जाईल. म्हस्केही टेन्शनमध्ये होते. ठाणे हा एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे यांचा बालेकिल्ला आहे. कल्याणमध्ये गेलोच नाही. श्रीकांत यांनी सांगितलं की बाकी मतदारसंघात फिरा मी इथे बघेन.  श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या कामाच्या जोरावर आपली ओळख निर्माण केली.

मुंबईतील 4 जागा कशामुळे गेल्या हे आता आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही. 13 जागांवर उबाठा आणि आपण समोरासमोर लढल्या. त्यातील 7 जागा आपण जिंकलो. त्यांचा स्ट्राईक रेट ४२ टक्के आणि आपला स्ट्राईक रेट आहे ४७ टक्के. त्यांना १३ जागांवर ६० लाख मते मिळाली. आपल्याला ६२ लाख मते मिळाली. आपल्या १५ उमेदवारांना सरासरी ४ लाख ९३ हजार मते मिळाली आणि त्यांच्या २१ उमेदवारांना ४ लाख ५० हजार मते मिळाली. खरी शिवसेना ही त्यांच्यापेक्षा सरस आहे. 

खरी शिवसेना कोणाची हा निकाल या निवडणुकीमध्ये जनतेने दिला आहे. त्यामुळे वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार तुमचा आणि आमचा आहे. काँग्रेस ३२८ जागा लढवून ९९ जागांवर जिंकली. काठावरही पास झाली नाही. तरीही इंडियाचं काँग्रेसचं सरकार आलं असा उन्माद दाखवत होती. १२ जागांवर हरलेली उबाठा जीत का जश्न साजरा करत होती. खुळं पोरगंही सांगेल की उबाठा काँग्रेसच्या वोट बँकेमुळे जिंकली आहे. सत्तेसाठी विचार सोडणारे हे लाचार आहे. काँग्रेसने बाळासाहेबांच्या मतदानाचा अधिकार काढून घेतला होता. आज काँग्रेसला मतदान करताना उबाठाचे हात थरथरले कसे नाही." 

भाजपकडे 100 जागा मागा

शिवसेना नेते रामदास कदम यांनी आपल्या भाषणात म्हटले की," विधानसभेत गाफील राहू नका. भाजपला विनंती करा. वेळेवर एकनाथ शिंदे यांचे 15 उमेदवार 2 महिन्यांपूर्वी दिले असते तर आज चित्र वेगळे असते. शिंदेंचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर भाजपची मंडळी उटायची आमची जागा...आमची जागा. शिंदे साहेब हे थांबवा नाहीतर मला घेऊन जा. शिंदे साहेब मोदी- शाहांना सांगा, 100 उमेदवार द्या 90 आमदार नाही निवडून आणले तर तुम्ही सांगाल ते हरू. "

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
'बदलापूरच्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या' कोणी केली मागणी?
भाजपकडे 100 जागा मागा, एकनाथ शिंदेंसमोर रामदास कदमांची मागणी
Dharmaraobaba Atram daughter bhagyashree-atram-joins-ncp-sharad-pawar-faction
Next Article
'बाबा वाघ तर मी वाघीण, वाघीण जास्त घातक' धर्मरावबाबांच्या लेकीचं पहिलचं भाषण गाजलं