जाहिरात

उरण-पनवेल विधानसभा : ठाकरे गट आणि शेकापमधील वाद चिघळला, निवडणूक आयोगाकडे पोहोचलं प्रकरण

पनवेलमधील एका सभेत शेकापचे उमेदवाराने प्रसिद्ध केलेल्या पत्रकारत महाविकास आघाडी हा शब्द वगळला असला तरी मविआच्या राष्ट्रीय आणि स्थानिक नेत्यांची छायाचित्रं लावून प्रचार करण्यात आला होता.

उरण-पनवेल विधानसभा : ठाकरे गट आणि शेकापमधील वाद चिघळला, निवडणूक आयोगाकडे पोहोचलं प्रकरण
उरण:

उरण आणि पनवेल विधानसभा मतदारसंघात (Assembly Election 2024) शेतकरी कामगार पक्ष आणि ठाकरे गटामध्ये वाद रंगला आहे. ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे शेकापच्या उमेदवारांविरोधात तक्रार दाखल केली आहे. उरण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि ठाकरे गटाचे उमेदवार मनोहर भोईर असताना शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार प्रीतम म्हात्रे महाविकास आघाडीतील नेत्यांचे फोटो वापरत असल्याने ठाकरे गटाकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. याच पद्धतीने पनवेल मतदारसंघातील शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील हेदेखील महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्याचे फोटो वापरत असल्याचं सांगत ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. 

'उद्धव ठाकरेंकडून बाण गेला फक्त खान उरले...' मालाडमध्ये 'राज'गर्जना

नक्की वाचा - 'उद्धव ठाकरेंकडून बाण गेला फक्त खान उरले...' मालाडमध्ये 'राज'गर्जना

राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीत मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान शेतकरी कामगार पक्ष मविआचा भाग होता. मात्र विधानसभा निवडणुकांच्या जागावाटपात शेकापने अलिबाग, पेण, उरण, पनवेल या चार जागांवर दावा केला होता. मात्र उरणची जागा सोडण्यास ठाकरेंनी नकार दिला. या मतदारसंघातून ठाकरे गटाचे माजी आमदार मनोहर भोईर पुन्हा एकदा रिंगणात उतरले आहेत.  

दरम्यान पनवेलमधील एका सभेत शेकापचे उमेदवाराने प्रसिद्ध केलेल्या पत्रकारत महाविकास आघाडी हा शब्द वगळला असला तरी मविआच्या राष्ट्रीय आणि स्थानिक नेत्यांची छायाचित्रं लावून प्रचार करण्यात आला होता. प्रचारात नेत्यांचे फोटो वापरून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करून आचारसंहितेचा भंग करत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप आहे. शेकापचे उमेदवार प्रीतम म्हात्रे आणि बाळाराम पाटील यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. अलिबाग येथे शेकापच्या उमेदवारांना ठाकरे गटाने पाठिंबा दिला असून उरण-पेण-पनवेल येथे शेकाप तसेच ठाकरे गटाने देखील उमेदवार दिले आहेत.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com