
आकाश सावंत
नोकरी देण्याचे खोटे आमिष दाखवून एका 20 वर्षीय परप्रांतीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील हा धक्कादायक प्रकार असून या प्रकरणात तृतीयपंथी पूजा गुट्टेचा हात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. पूजा फरार असून पोलीस तिच्या मागावर आहेत. पूजाने मूळच्या हैदराबादच्या असलेल्या एका तरुणीला नोकरीचे आमीष दाखवले होते. परळी तालुक्यातील अस्वलआंबा शिवारातील ही घटना असून या प्रकरणात तृतीयपंथी पूजा गुट्टेसह एकूण चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी या प्रकरणात तीन आरोपींना अटक केली असून या घटनेने बीड जिल्ह्याला पुन्हा एकदा डाग लागला आहे.
( नक्की वाचा: कोकणात जाणे दुबई-सिंगापूरपेक्षाही महाग; तिकिटाचे दर पाहून गणेशभक्त गरगरले! )
पूजाने गोड बोलून फसवले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी मूळची हैदराबादची रहिवासी असून ती मुंबईत घरकामे करत होती. मुंबईहून तिने हैदराबादला जाण्यासाठी रेल्वे पकडली होती. प्रवासात भूक लागल्याने ती परळी स्टेशनवर उतरली. या हॉटेलमध्ये जेवत असतानाच तिला तृतीयपंथी पूजा गुट्टेने हेरलं होतं. गप्पा मारण्याच्या बहाण्याने पूजाने तिच्याशी ओळख केली आणि नंतर तिला नोकरी मिळवून देण्याचे आमीष दाखवले. पूजाच्या गोड बोलण्याला पीडिता भुलली होती. यामुळे ती जे सांगेल ते करण्यासाठी ती तयार झाली होती.
पीडितेला कोंडून ठेवत मारहाण
पीडितेचा आपल्यावर विश्वास बसल्याचे कळाल्यानंत पूजाने सतीश अण्णासाहेब मुंडे आणि मोहसीन सरदार पठाण यांना बोलावून घेतले. या तिघांनी पीडितेला मोटारसायकलवर बसवले आणि तिला अस्वलआंबा येथील भागवत अंगद कांदे या चौथ्या आरोपीच्या घरी नेले. या चौघांनी पीडितेला एका खोली कोंडून ठेवले. तिथे पीडितेला जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आणि तिला बेदम मारहाणही करण्यात आली. यानंतर तीनही आरोपींनी म्हणजे सतीश अण्णासाहेब मुंडे, अंगद कांदे आणि मोहसीन सरदार पठाण यांनी पीडितेवर बलात्कार केला.
( नक्की वाचा: 23 वर्षाचा तरणाबाण तरुण, 3 महिला अन् एक हत्या, न उलघडणारं कोडं )
शनिवारी पहाटे अस्वलआंब्यातील एका नागरिकाला हा सगळा प्रकार कळाला ज्यानंतर त्याने 112 नंबरवर फोन करून पोलिसांशी संपर्क साधला होता. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत तातडीने हालचाली सुरू केल्या. परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार टोले आपल्या टीमसोबत घटनास्थळी पोहोचले. पोलीस आल्याचे कळताच तृतीयपंथी पूजा गुट्टेने तिथून पळ काढला, मात्र सतीश मुंडे, मोहसीन पठाण आणि भागवत कांदे हे तिघेही जण पोलिसांच्या हाती लागले आहेत. या तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world