संकेत कुलकर्णी, पंढरपूर
महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत सोलापूरच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत मोठी आणि नाट्यमय घडामोडी समोर आली आहे. सोलापूर विधान परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला आणि पर्यायाने महायुतीला जोरदार धक्का बसला आहे. शिवसेना शिंदे गटात नुकताच प्रवेश केलेले नेते भगीरथ भालके यांच्या 'तीर्थक्षेत्र विकास आघाडी'चे गटनेते नागेश भोसले यांनी महायुतीशी थेट बंडखोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे. नागेश भोसले यांनी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आदित्य फत्तेपुरकर यांच्या उमेदवारी अर्जावर 'सूचक' म्हणून स्वाक्षरी केल्याने राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.
नेते शिंदे गटात, तर गटनेते काँग्रेसच्या पाठीशी
काही दिवसांपूर्वीच सोलापूर जिल्ह्यातील मातब्बर नेते भगीरथ भालके यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला होता. त्यांच्या या प्रवेशामुळे सोलापूर आणि पंढरपूर परिसरात शिंदे गटाची ताकद वाढेल, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, भालके यांच्याच 'तीर्थक्षेत्र विकास आघाडी'चे गटनेते नागेश भोसले यांनी पक्षाच्या आणि महायुतीच्या धोरणाविरुद्ध पाऊल उचलले आहे.
(नक्की वाचा- VIDEO: झाडावरून अचानक सुरु झाला पैशांचा पाऊस! जमिनीवर नोटांचा थर; वर पाहिलं तर...)
काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपुरकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असता, त्यावर तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे गटनेते नागेश भोसले यांनी सूचक म्हणून स्वतःची सही केली. भगीरथ भालके यांनी शिंदे सेनेत प्रवेश केलेला असताना, त्यांच्याच आघाडीचे प्रमुख गटनेते महायुतीविरोधात उभे ठाकल्याने राजकीय गणिते बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
(नक्की वाचा- Vaibhav Sooryavanshi: वैभवसमोर मोठा पेच; अलिशान कार जिंकली, पण एक खंत सतत सतावेल!)
शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर
ऐन निवडणुकीच्या तोंडावर भालके यांच्या अत्यंत विश्वासू आणि आघाडीच्या गटनेत्यानेच काँग्रेस उमेदवाराला उघड पाठिंबा दिल्याने शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत मतभेद आणि समन्वयाचा अभाव आता पूर्णपणे चव्हाट्यावर आला आहे. भगीरथ भालके यांच्या पक्षप्रवेशानंतरही त्यांच्या स्थानिक आघाडीतील सर्व लोक लोकशाही आघाडी किंवा महायुतीसोबत खंबीरपणे उभे राहू शकले नाहीत, हेच या घटनेवरून सिद्ध होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world