- विधान परिषद निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर-जालना मतदार संघ भाजपच्या वाट्याला गेला आहे
- भाजपने शिवसेनेला कमजोर करण्याचा प्रयत्न चालवला आहे असा आरोप सत्ता यांनी केला
- शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सत्तार यांना भाजप सोबत जाण्याबाबत टीका केली आहे
विधान परिषद निवडणुकीवरून महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा भाजपच्या वाट्याला गेली. त्यामुळे शिवसेना नेते आणि माजी मंत्री अब्दुल सत्ता हे नाराज झाले. त्यांनी थेट भाजपला लक्ष्य केलं आहे. ते म्हणाले भाजपने आमचे हातपाय आधीच तोडले होते. आता थेट मुंडकंच तोडून टाकलं आहे, अशा शब्दात सत्तार यांनी भाजपवर आगपाखड केली. शिवाय दोन्ही शिवसेनेनी आता एकत्र आलं पाहीजे अशी भूमीका ही मांडली. यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आता त्यांना पश्चाताप झाला असेल असं मत व्यक्त केलं आहे.
सत्तार यांनी अतिशय कडवट शब्दात भाजपचा समाचार घेतला आहे. शिवसेनेचं मुंडकं उडवण्याचं काम मित्रपक्षच करत आहे. ते पुढे म्हणतात, आमचा त्याग गुवाहाटीतील कामाख्या देवीला माहित आहे. पण भाजप तो त्याग आता पूर्णपणे विसरलीय. भाजपच आमच्या पक्षात गटतट पाडत आहे. त्यांनी आमचे हातपाय आधीच तोडले होते, आता थेट मुंडकंच तोडून टाकलं आहे." अशा शब्दात भाजपला फटकारले आहे. आधी आमची जिल्हा परिषद गेली. महापालिकेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंपासून सत्ता होती ती सत्ता ही संपली. आता आमच्याकडे राहिलं काय? असा सवाल त्यांनी केला. शिवसेना संपवली जात आहे असा आरोप ही त्यांनी यावेळी केला. शिवाय दोन्ही शिवसेनेनी आता एकत्र यायला पाहीजे अशी मागणी ही त्यांनी केली.
सत्तार यांच्या या वक्तव्याचा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. राऊत म्हणाले, तुम्ही आणि तुमचे नेते भाजप सोबत का गेलात? आज तुम्ही आणि तुमचे नेते भाजपचे घरगडी म्हणून काम करत आहात. ही भूमिका तुम्ही का स्वीकारली? त्यावर आधी बोला असं राऊत म्हणाले. शिवाय हा सल्ला तुमच्या नेत्यांना द्या अशा शब्दात राऊत यांनी फटकारले आहे. राऊत पुढे म्हणाले की भाजपबरोबर जाणं म्हणजे महाराष्ट्राशी बेईमानी, महाराष्ट्राला खड्डयात घालणं आहे. सत्तार यांनी त्यांच्या नेतृत्वावाला हे सांगावं असं राऊत म्हणाले.
नक्की वाचा - Big News: भाजपला मोठा धक्का बसणार? बडा नेता बंडाच्या तयारीत, स्वत:चा पक्ष काढणार
दोन शिवसेना एकत्र आल्या पाहीजेत या सत्तारांच्या वक्तव्यावर ही राऊत यांनी प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणतात दोन शिवसेना नाहीत. शिवसेना ही फक्त एकच आहे. ती म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांची. ज्या शिवसेनेची हे लोक गोष्ट करत आहेत ती अमित शहांची आहे. त्यांनी निवडणूक आयोगाला हाताशी धरून कट कारस्थान करून ती तात्पूर्ती कंपनी स्थापन केली आहे. जर त्याचा आत कुणाला पश्चाताप होत असेल तर त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करावी असा सल्लाही राऊत यांनी या निमित्ताने सत्तार यांना दिला आहे. दरम्यान शिवसेना आणि भाजपमधला वाद चव्हाट्यावर आला आहे. छत्रपती संभाजीनगर जालना मतदार संघातून भाजपने सुहास शिरसाट यांना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांचा मुलगा समीर सत्तार यांनी बंडखोरी करत निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world