संकेत कुलकर्णी, प्रतिनिधी
Pandharpur News : दिवसरात्र शेतात राबायचं, कष्ट करायचे आणि वर्षाकाठी काही शे रुपये हातात आल्यावर कोणत्याही व्यक्तीच्या डोळ्यात अश्रूच येईल. सध्या महाराष्ट्रातील कित्येक कांदा उत्पादक शेतकऱ्यांची हीच व्यथा आहे. कांद्याची काळजी घेतली, त्याला पाणी दिलं, महागडं खत घातलं, जीवाचं रान करून शेती केली. मात्र शेवटी अवघे ४०० रुपये हाती आल्याने त्या शेतकऱ्याची काय अवस्था झाली असेल याचा आपण विचारही करू शकत नाही. 73 पोती विकून शेतकऱ्याच्या हातात पडले फक्त 400 रुपये. कांद्याला प्रतिकिलो 50 पैसे भाव मिळाला. बळीराजाच्या नशिबी आलेली दैना पुन्हा एकदा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहायला मिळाली.
७३ गोणी कांदा विकल्यानंतर किती रुपये येतात?
करमाळा तालुक्यातील पांगरे येथील शेतकरी अंकुश अण्णा गुंजाळ यांना बाजारभावात झालेल्या प्रचंड घसरणीचा मोठा फटका बसला आहे. 73 गोणी कांदा विकल्यानंतर सर्व खर्च वजा जाता या शेतकऱ्याच्या हातात केवळ 400 रुपये मिळाले आहेत. अंकुश गुंजाळ यांनी आपल्या शेतात कष्टाने पिकवलेला कांदा 21 एप्रिल 2026 रोजी सोलापूरच्या शरीफ ट्रेडर्स या आडत दुकानावर विक्रीसाठी आणला होता. एकूण ७३ पिशव्या (पोती) कांदा त्यांनी विक्रीसाठी लावला होता. मात्र, बाजारपेठेत कांद्याची आवक वाढल्याने किंवा मागणी घटल्याने त्यांच्या कांद्याला प्रति किलो केवळ ५० पैसे इतका निचांकी भाव मिळाला.
कांद्याचं उत्पन्न होण्यासाठी जवळपास ४ महिने त्याची काळजी घ्यावी लागते, या ४ महिन्याच्या मेहनतीचं फळ केवळ ४०० रुपये मिळाल्याने शेतकऱ्याच्या संकटात वाढ झाली आहे.
मिळालेल्या पट्टीनुसार, कांद्याच्या विक्रीतून मिळालेली एकूण रक्कम आणि त्यावर झालेला खर्च यांचा ताळमेळ बसवणे कठीण झाले आहे. 73 पिशव्या कांदा विकल्यानंतर अंकुश गुंजाळ शेतकऱ्याला एकूण 5068 रुपये मिळाले होते. वाहतुकीचे गाडी भाडे, हमाली, तोलाई आणि इतर आडत खर्च वजा जाता, प्रत्यक्षात शेतकऱ्याला केवळ 400 रुपये मिळाले आहेत. शेतकऱ्याकडे सरकारने लक्ष देऊन प्रत्येक पिकाला हमीभाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळी दिली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world