संकेत कुलकर्णी, पंढरपूर
Solapur News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची मुंबईत महत्त्वाची बैठक आयोजित केली होती. मात्र, या बैठकीला सोलापूर जिल्ह्यातील तीन विद्यमान आमदारांनी गैरहजेरी लावल्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तीन आमदारांनी दांडी मारल्याने राजकीय वर्तुळात उसटसुलट चर्चा देखील सुरु झाल्या आहेत.
सोलापूरमधील करमाळ्याचे आमदार नारायण पाटील, माळशिरसचे आमदार उत्तम जानकर, मोहोळचे आमदार राजू खरे यांनी शरद पवारांच्या बैठकीला अनुपस्थित राहिले आहेत. या बैठकीत सोलापूरमधून पक्षाचे केवळ खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार अभिजीत पाटील हे दोघेच उपस्थित होते.

Solapur News
नाराजीमुळे नव्या राजकीय भूमिकेची चर्चा
भाजपने सोलापूर जिल्ह्यात 'ऑपरेशन लोटस' सक्रिय केले असताना, अजित पवार गटाचे तीन माजी आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. अशातच, शरद पवार गटाच्या तीन विद्यमान आमदारांनी पक्षाच्या एवढ्या महत्त्वाच्या बैठकीला दांडी मारल्यामुळे ते पक्षात नाराज असल्याची कुजबुज सुरू झाली आहे.
अजित पवार गटाच्या माजी आमदारांपाठोपाठ आता शरद पवार गटाचे हे तीन विद्यमान आमदारही पक्षावर नाराज होऊन कोणती नवी राजकीय भूमिका घेणार का, याबद्दल तर्क-वितर्क लावले जात आहेत. आमदारांची ही गैरहजेरी सोलापूर जिल्ह्यातील पक्षांतर्गत राजकारणात मोठे बदल घडवून आणण्याची चिन्हे आहेत. या आमदारांच्या पुढील भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world