लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडलं असून येत्या काही दिवसात 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्याचं मतदार पार पडणार आहे. दरम्यान अद्यापही पालघर, नाशिक, ठाणे या मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाही. याशिवाय उत्तर मध्य मुंबई या एकमेव मतदारसंघातून महाविकास आघाडी आणि महायुतीपैकी कोणीच उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे या शिल्लक राहिलेल्या मतदारसंघांचा तिढा कधी सुटणार हा मोठा प्रश्न आहे.
दरम्यान ठाणे मतदारसंघातून महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ठाणे मतदारसंघासाठी महायुतीकडून शिंदे गटासह भाजपही आग्रही आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातील सहापैकी चार जागांवर भाजपचा उमेदवार असल्याने भाजपकडून या जागेवर दावा केला जात आहे. तर दुसरीकडे आनंद दिघेंचा वारसा असलेल्या ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कायमच आग्रही राहिले आहेत. त्यामुळे या जागेवर काय घडणार याबाबत सर्वांचच लक्ष लागले आहे. दरम्यान भाजपने या जागेचा दावा सोडल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
हे ही वाचा-'फडणवीसांना अटकेची भीती तर शिंदेंना...' राऊतांचा 'त्या' आरोपावर मोठा गौप्यस्फोट
या जागेसाठी भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू होती. त्यानंतर भाजपकडून संजीव नाईक आणि आमदार संजय केळकर यांची नावं पुढे आली होती. दुसरीकडे शिवसेनेच्या शिंदे गटाकडून प्रताप सरनाईक यांचे नाव चर्चेत होते. त्यानंतर प्रताप सरनाईक यांनी पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची माहिती मागवल्याचे पत्र समाज माध्यमावर प्रसारित देखील झाले होते. आता मात्र भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये ठाण्याच्या जागेचा दावा सोडल्याची कुजबुज ऐकायला मिळत आहे. त्यामुळे ही जागा भाजपने सोडल्याचा दावा आता पक्षातूनच केला जात असला तरी यावर स्पष्ट बोलण्यास भाजपचे नेते नकार देत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ठाण्यातील लढत ही शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये होणार असल्याची शक्यता वाढली आहे.
ठाण्यात कशी असेल लढत?
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे चार दिवस शिल्लक राहिलेले असताना महायुतीकडून जरी उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नसली तरी दुसरीकडे महाविकास आघाडीतून शिवसेना ठाकरे गटाचे राजन विचारे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसात त्यांनी ठाणे मतदारसंघ अख्खा पिंजून काढला आहे. त्यामुळे आता ठाणे मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार कधी घोषित होणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world