- संजय तिवारी, नागपूर
नागपुरात मद्यधुंद अवस्थेत भरधाव कार चालवून चालकाने तीन जणांना धडक दिल्याचे वृत्त समोर आले आहे. या अपघातात चिमुकल्यासह एकूण तीन जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जखमी झालेल्या चिमुकल्याची मुलाची प्रकृती गंभीर असल्याचे म्हटले जात आहे. शुक्रवारी (24 मे 2024) कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील झेंडा चौक परिसरात हा अपघात झाला. या प्रकरणी बेदरकारपणे गाडी चालवणाऱ्या कार चालकासह तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
(नक्की वाचा: नागपूरातील 'त्या' प्रकरणातील आरोपी रितिका मालूचा अंतरिम अटकपूर्व जामीन रद्द)
नागरिकांनी गाडीची केली तोडफोड
या घटनेनंतर संतापलेल्या जमावाने कारची तोडफोड देखील केली. अपघातानंतर गाडीतील तिघांनीही घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण नागरिकांनी त्यांचा पाठलाग केला. यादरम्यान तावडीमध्ये सापडलेल्या एका तरुणाला त्यांनी चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले.
(नक्की वाचा: विशाल अग्रवालच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नावर शरद पवार चिडून म्हणाले...)
"कार चालकासह गाडीमध्ये असलेले अन्य दोघे जणही मद्यधुंद अवस्थेत होते. तसेच गाडीमध्ये दारूच्या बाटल्यांसह अमली पदार्थ देखील सापडले", अशी माहिती डीसीपी गोरख भामरे यांनी दिली आहे.
( नक्की वाचा : 1 तास TV, 2 तास गेम : रिमांड होममध्ये असा जाणार बिल्डरपुत्राचा दिवस, काय मिळणार खायला? )
मर्सिडीजच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू
दरम्यान फेब्रुवारी महिन्यातही नागपुरात मर्सिडीज कारने दोन तरूणांना उडवले होते. या दुर्घटनेमध्ये दोघांचाही मृत्यू झाला होता. मर्सिडीज कार महिला चालवत होती. तिच्यासोबत तिची मैत्रीणही होती. या दोघीही मद्यधुंद अवस्थेत होत्या, असा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणात आरोपींना तातडीने जामीन मिळाला होता.
अपघातात मोहम्मद अतिफ ( वय 32 वर्षे) आणि मोहम्मद हुसैन ( वय 34 वर्षे) या तरुणांचा मृत्यू झाला होता. हे दोघंही बाईकने प्रवास करत होते. त्याचदरम्यान मागील बाजूने आलेल्या भरधाव कारने त्यांच्या बाईकला जोरदार धडक दिली. अपघातात मोहम्मद हुसैनचा जागीच मृत्यू झाला होता तर मोहम्मद अतिफने उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. रितिका मालू आणि माधुरी सारडा अशी आरोपींची नावे आहेत. रितीका मालू ही गाडी चालवत होती. अपघाताच्या वेळेस दोघीही मद्यधुंद अवस्थेत असल्याची बाब वैद्यकीय तपासणीतही स्पष्ट झाली होती.
पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. या घडामोडींदरम्यान नागपुरातील रितिका मालू प्रकरणही चर्चेत आले. त्यामुळे अन्य प्रकरणांचे उदाहरण देत कोर्टाने रितिका मालूचा जामीन देण्याचा अर्ज फेटाळला आहे.