
राहुल कुलकर्णी, पुणे: मानवी वस्तीमध्ये बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पाहायला मिळत आहे. पुण्यामध्ये अनेक भागात मानवी वस्तींमध्ये बिबट्या आढळल्याचे समोर आले होते. अशातच आता पुणे विमानतळावर बिबट्या आढळल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर प्रवासी तसेच नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोमवारी (ता. 28) पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ बिबट्याचे दर्शन झाले, यानंतर वनविभाग आणि विमानतळ प्रशासनाने तातडीने कारवाई केली. काल सकाळी सुमारे 7 वाजता आणि पुन्हा सायंकाळी 7 वाजता विमानतळ परिसरात, धावपट्टीजवळ आणि नव्या प्रवासी टर्मिनल इमारतीजवळ, बिबट्याला पाहिले गेले. ज्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
सोशल माध्यमांवर फिरणाऱ्या व्हिडीओंमध्ये बिबट्या विमानतळाच्या निर्बंधित क्षेत्रात फिरताना दिसत आहे, ज्यामुळे प्रवासी आणि लोहेगाव, विमाननगरसारख्या जवळील परिसरातील रहिवाशांमध्ये चिंता आहे. या घटनेनंतर पुणे वनविभागाने कॅमेरा ट्रॅप्स लावले असून बिबट्याचा ठावठिकाणा शोधून त्याला सुरक्षितरित्या पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे.
बिबट्या शेजारच्या जंगल परिसरातून किंवा शेतातून विमानतळ परिसरात शिरला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उड्डाणसेवेवर याचा कोणताही परिणाम झाला नाही. रहिवाशांना सतर्क राहण्याचे आणि आणखी कुठे बिबट्या दिसल्यास वनविभागाला तत्काळ कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जनतेची आणि बिबट्याची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच नागरीक आणि प्रवाशांना सतर्कतेचे आवाहनही करण्यात आले आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात एका 21 वर्षीय युवतीचा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला आहे. वनारवाडी गावात अखंड हरिनाम सप्ताह संपल्यानंतर चव्हाण कुटुंबीय त्यांच्या शेतात गवत कापण्याचे काम करत होते, याचवेळी पायल चव्हाण ही गाईसाठी चारा घेऊन येत असतांनाच शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक तिच्या मानेवर हल्ला केला आणि तिला काही फूट फरफटतही नेले. गंभीर जखमी झालेल्या पायलला रुग्णालयात दाखल करताच उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जाते आहे. बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जाते आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world