रेवती हिंगवे, पुणे: विधानसभा निवडणुकीत गडगड झाल्याचा संशय व्यक्त करत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचे पुण्यामध्ये आत्मक्लेष उपोषण सुरु आहे. या आंदोलनस्थळी आज शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. या भेटीत उद्धव ठाकरे यांनी बाबा आढाव यांना आंदोलन सोडण्याचे आवाहन केले, ज्यानंतर बाबा आढाव यांनी आपले हे उपोषण सोडले. या भेटीवेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित करताना निवडणूक निकालावरुन सरकारवर सडकून टिका केली.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
'आजची भेट ही आयुष्यभर लक्षात राहिल. आपले आशीर्वाद येण्याचे कित्येक दिवस मनात होते. आजही तुम्ही आम्हाला प्रेरणा देत आहात. सरकारी ताफा गेला. जिंकलेलेही इथे येत आहेत आणि हारलेलेही इथे आहेत. या निकालावर जिंकलेल्यांचाही विश्वास नाही आणि हारलेल्यांचाही विश्वास नाही.जिंकलेल्यांना धक्का आहे आपण जिंकलो कसं आणि हारलेल्यांना म्हणजे आम्हाला धक्का आहे. आम्ही हारलो कस?' असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
'याआधी सत्यमेव जयते आपण म्हणत होतो, आता सत्तामेव जयते सुरु झालं आहे, त्याविरोधात आपण उभे राहिले आहोत. या छोट्याशा आंदोलनाने काय होईल असं वाटत असेल. मात्र वणवा पेटायला एक ठिणगी पुरेशी असते. ती ठिगणी आज पडलेली आहे. जिंकलेले सुद्धा इथे हारल्यासारखे येत आहेत. हारलेले जिंकलेल्या सारखे येत आहेत. याचे एकमेव कारण ईव्हीएम, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
नक्की वाचा: 'जनतेचा कौल बदलला, आम्ही काय करणार?' बाबा आढाव यांच्यासमोर अजित पवारांचा सवाल
एकनाथ शिंदेंना टोला...
'सगळ्यात महत्वाचं पाशवीपेक्षा जास्त राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर राज्यात आनंदोत्सव का नाही. सगळ्यांचे चेहरे पडलेले आहेत. आमची महाविकास आघाडी झाली तेव्हा राष्ट्रपती राजवट लागली होती. आज विधानसभेची मुदत संपल्यानंतरही अद्याप राष्ट्रपती राजवट का लागली नाही. बहुमत आल्यानंतरही राज भवनावर जाण्याऐवजी लोक शेतामध्ये का जातात. अमावस्याचा मुहूर्त का बघतात. मुख्यमंत्रीपदावर दावा का करत नाहीत? असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.
'बाबांसारखी अनुभवी माणूस असं कधीही घडले नाही,असे म्हणतात तेव्हा आपण कधी पुढे घेऊन गेले पाहिजे. महाविकास आघाडीकडून हे आंदोलन पुर्ण राज्यात नेले पाहिजे. जन आंदोलन उभे केले पाहिजे. महाराष्ट्र हा लेचापेचा नाही. शिवसेना म्हणून आम्ही सर्व जण राष्ट्रवादी आणि काँग्रेसही लोकशाही वाचवण्यासाठी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. तुमचे आंदोलन आम्ही पुढे घेऊन जावू,' असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
महत्वाची बातमी: शिव्या द्याल तर 500 रूपये दंड! 'या' ग्रामसभेच्या ठरावाची राज्यभर चर्चा