अरुणादेवींचे मोठे आव्हान, शिंदेंचा शिलेदारही अपक्ष भिडणार; आमदारकीसाठी मकरंद पाटलांचा कस लागणार!

आमदार मकरंद पाटील यांच्याविरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अरुणादेवी पिसाळ मैदानात उतरल्या आहेत, तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव यांनीही अपक्ष दंड थोपटले आहेत. त्यामुळे  मकरंद पाटील यांचे टेन्शन चांगलेच वाढले आहे.

जाहिरात
Read Time: 4 mins
सातारा::

राज्याच्या राजकारणात विधानसभेचा रणसंग्राम सुरु आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती तसेच महाविकास आघाडीमध्ये अनेक इच्छुकांनी बंडाचा झेंडा फडकावल्याने दिग्गजांचे टेन्शन वाढले आहे. त्यामुळे अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा आमदारकी मिळवण्यासाठी ताकद पणाला लावावी लागणार आहे. यापैकी महत्वाचा मतदार संघ म्हणजे वाई- खंडाळा महाबळेश्वर. वाई खंडाळा महाबळेश्वरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार मकरंद पाटील यांच्याविरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अरुणादेवी पिसाळ मैदानात उतरल्या आहेत, तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव यांनीही अपक्ष दंड थोपटले आहेत. त्यामुळे  मकरंद पाटील यांचे टेन्शन चांगलेच वाढले आहे. कसं असेल वाई- खंडाळा विधानसभेचे राजकीय गणित? वाचा सविस्तर... 

वाई मतदार संघात तिरंगी लढत!

सातारा जिल्ह्याच्या राजकारणात वाई मतदार संघ नेहमीच महत्वाचा राहिला आहे. किसनवीर आबा, प्रतापराव भोसले, लक्ष्मणराव पाटील, मदनराव पिसाळ असा मातब्बर दिग्गजांचा वारसा या मतदारसंघाला लाभला आहे. मतदारसंघ पुनर्रचनेत महाबळेश्‍वर व खंडाळा तालुके पूर्णपणे मतदारसंघाशी जोडले गेल्यामुळे हा मतदारसंघ खूप मोठा झाला आहे. त्यामुळे येथील लोकप्रतिनिधींना सर्व भागात संपर्काचे मोठे आव्हान असते.  वाई मतदारसंघ यापूर्वी काँग्रेस आणि गेल्या तीन टर्मपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार मकरंद पाटील यांच्यापुढे मविआ पुरस्कृत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सातारा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अरुणा देवी पिसाळ यांचं आव्हान आहे. तर कडवट शिवसैनिक व हेवीवेट नेते पुरुषोत्तम जाधव यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

Advertisement

काँग्रेस, राष्ट्रवादीचे वर्चस्व! 

वाई विधानसभा मतदारसंघ शेकापला थोपवून काँग्रेसकडे आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडे झुकलेला. १९६२ पासून दोन्ही पक्षांखेरीज इतर कोणताच पक्ष इथं उभारी धरू शकलेला नाही. खंडाळा तालुका पूर्वी निम्मा वाईकडे आणि निम्मा फलटण मतदारसंघात होता आणि महाबेळश्‍वर तालुका पूर्वीच्या जावळी मतदारसंघात होता. पुनर्रचनेनंतर वाई, खंडाळा व महाबळेश्‍वर या तीन तालुक्यांचा समावेश या मतदारसंघात झाला. महाबळेश्‍वर आणि खंडाळ्याला आतापर्यंत विधानसभेत एकदाही संधी मिळू शकलेली नाही. इथून निवडून येणारा उमेदवार वाई तालुक्यातीलच असतो. त्यामुळे विशेषतः खंडाळा तालुक्यातून उमेदवारीची मागणी नेहमी होत असते. तरीही १९६२ पासून आतापर्यंत भोसले, पाटील आणि पिसाळ या तीन घराण्यांशिवाय विधानसभेत कुणालाही संधी मिळाली नाही. भोसले आणि पाटील या दोन घरांमध्येच बहुतेक लढती रंगल्या होत्या. मात्र यावेळी पिसाळ विरुद्ध पाटील अशी लढत होत आहे. 

Advertisement

नक्की वाचा: '...आता पाडापाडी' जरांगे बोलले, कोणाचे धाबे दणाणले?

मकरंद पाटलांची एकहाती सत्ता! 

 मतदारसंघात महाबळेश्‍वर, पाचगणी आणि वाई परिसर पर्यटन विकासाला अनुकूल आहे. धोम आणि धोम बलकवडी ही दोन धरणे वाई तालुक्यात आहेत. त्यामुळे शेतीत ऊस, हळद यांसह विविध पिके आहेत. वाई येथे मराठी विश्‍वकोष कार्यालय तसेच प्राज्ञ पाठशाळा आहे. कृष्णाकाठी महागणपती व इतर मंदिरांसमवेत वसलेल्या वाई शहर व परिसराला सांस्कृतिक वारसा मोठा आहे. भुईंजला किसन वीर साखर कारखाना आहे. त्यामुळे मतदारसंघातील प्रभावी गाव म्हणून वाई महत्त्वाचे असल्याने राजकारणही वाईभोवतीच फिरत राहते. खंडाळा तालुक्यात खंडाळा, शिरवळ आणि लोणंद ही तिन्ही मोठी गावे आहेत. हा परिसर आता औद्योगिकदृष्ट्या विकसित होत असल्याने या तालुक्यातूनही उमेदवारीची मागणी वाढली आहे. विद्यमान आमदार मकरंद पाटील यांचा प्रभाव सध्या मोठा आहे. मदन भोसले त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी.

 राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर १९९९ व २००४ मध्ये ते सातारा मतदारसंघातून खासदार झाले. त्यांचे चिरंजीव मकरंद पाटील यांना २००४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली. त्यावेळी अपक्ष म्हणून रिंगणात उतरुन मदन प्रतापराव भोसले विजयी झाले. त्यानंतर मात्र मकरंद पाटील यांनी २००९ मध्ये अपक्ष, २०१४ व २०१९ या दोन निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजय मिळवला. या पार्श्‍वभूमीवर आता होणारी निवडणूक आतापर्यंच्या निवडणुकांपेक्षा खूप वेगळी होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवार यांच्या गटात मकरंद पाटील गेल्यामुळे आणि लोकसभेच्या निवडणुकीत ऱाष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकातं शिंदे यांना मताधिक्य मिळाल्यामुळे आपली जागा टिकवण्यासाठी या पक्षाने निकराचे प्रयत्न सुरु केले आहेत. 

ट्रेडिंग बातमी: 'जातीय जनगणना होणारच, आरक्षणाची 50% ची मर्यादाही वाढवणार'

अरुणा पिसाळ, जाधवांचे आव्हान, पाटलांचा कस लागणार?

वाईमध्ये होणाऱ्या या तिरंगी लढतीत कट्ट्रर शिवसैनिक पुरुषोत्तम जाधव हे अपक्ष रिंगणात उतरले आहेत. त्यामुळं या लढतीकडं राज्याचं लक्ष लागलं आहे. पुरुषोत्तम जाधव हे कडवट शिवसैनिक आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून जाधव यांनी शिवसेनेचा भगवा फडकवत ठेवला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर जाधव यांनी खंबीरपणे त्यांना साथ दिली होती. गेल्या अडीच वर्षात जिल्हाप्रमुख म्हणून त्यांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढला. वाडीवस्तीवर जाऊन संघटना बांधली. लोकसभा निवडणुकीत ते साताऱ्यातून इच्छुक होते. मात्र, हा मतदारसंघ भाजपला गेल्यानं त्यांना माघार घ्यावी लागली. मात्र विधानसभेसाठी त्यांनी जय्यत तयारी केली. वाई मतदारसंघातून त्यांनी खूप आधीपासूनच तयारी केली. मात्र, महायुतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेला आहे. त्यामुळं जाधव यांनी अपक्ष शड्डू ठोकला आहे. 

Advertisement

तिसरी गोष्ट अजित पवार गटाकडून मकरंद पाटील यांचे बंधू जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांना राज्यसभेचे खासदार म्हणून संधी मिळाली. भुईंज कारखान्यातही आमदार अध्यक्ष व बंधू संचालक आहेत. त्यामुळे या गटाची ताकद आणखी वाढली आहे. ही जमेची बाजू असली तरी एकाच घरात इतकी पदे असल्याबाबतचा अपप्रचारही सुरु आहे. त्यामुळे ही लढत बहुरंगी होत असली तरी प्रामुख्याने पाटील- पिसाळ घराण्यात काटे की टक्कर होणार आहे. त्यामुळे मकरंद पाटलांना आपली आमदारकी टिकवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत.

ट्रेडिंग बातमी: अजित पवारांना महत्वाचे आदेश, ठाकरे मात्र वेटिंगवर! सेना- राष्ट्रवादीच्या पक्ष, चिन्ह प्रकरणात मोठी अपडेट