साजन ढाबे, वाशिम
Washim Tanker Accident: वाशीम जिल्ह्यातील कारंजा-मूर्तीझापूर रोडवर भीषण अपघाताची घटना घडली आहे. वर्धा जिल्ह्याच्या दिशेने डिझेल घेऊन जाणारा एक टँकर कारंजा-मूर्तीझापूर रस्त्यावरील तक्षशिला महाविद्यालयाजवळ अनियंत्रित होऊन पलटी झाला. या अपघातानंतर टँकरमधून मोठ्या प्रमाणावर इंधन गळती सुरू झाली, ज्यामुळे स्फोटाची भीती निर्माण झाली होती. मात्र, कारंजा ग्रामीण पोलिसांच्या तत्परतेमुळे आणि धाडसामुळे चालकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.
चालक केबिनखाली गंभीर अडकला
मिळालेल्या माहितीनुसार, टँकर पलटी झाल्यानंतर वाहनाचा चालक केबिनच्या खाली अत्यंत गंभीर अवस्थेत अडकला होता. अपघात इतका भीषण होता की चालकाला स्वतःहून बाहेर पडणे अशक्य झाले होते. त्यातच टँकरमधून डिझेलची वेगाने गळती सुरू झाल्यामुळे एखादी लहानशी ठिणगीही मोठ्या स्फोटाला कारणीभूत ठरू शकली असती. या दुहेरी संकटामुळे घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
(नक्की वाचा- Dombivli News: संतापजनक! हायप्रोफाईल सोसायटीत वृद्ध सुरक्षारक्षकाला मुजोर रहिवाशाकडून मारहाण, कारण... )
पोलिसांचा 45 मिनिटांचा संघर्ष
घटनेची माहिती मिळताच कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पथकाने एका क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून क्रेन पाचारण केली. पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने टँकरचा भाग उचलून बचावकार्य सुरू केले. तब्बल 45 मिनिटांच्या अथक प्रयत्नांनंतर पोलिसांनी केबिनखाली दबलेल्या चालकाला सुरक्षितपणे बाहेर काढले.
केबिनमधून बाहेर काढल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या चालकाला पोलिसांनी विनाविलंब उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. योग्य आणि वेळेत वैद्यकीय मदत मिळाल्यामुळे चालकाचे प्राण वाचले असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world