
Sudhir Mungantiwar on Walmik Karad : सध्या महाराष्ट्रामध्ये वाल्मिक कराड याचे नाव चर्चेत आहे. बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यालाही आरोपी करण्यात आलं आहे. कराड हा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचे बोलले जाते. संतोष देशमुख यांच्या हत्येचे भयावह फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता. या सगळ्या घडामोडी ताज्या असताना भाजप आमदाराने मंत्रालयातील वाल्मिक कराड कोण? (Who is Walmik Karad in Maharashtra Mantralay) असा सवाल करत खळबळ उडवून दिली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
धान उत्पादक शेतकऱ्यांचे झालेले नुकसानाचा मुद्दा विधानसभेमध्ये उपस्थित करण्यात आला. या धान उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नसून ती का मिळत नाही असा प्रश्न भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विचारला होता. आपल्याच सरकारविरोधात त्यांनी धारण केलेले उग्र रूप पाहिल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी मुनगंटीवार यांच्या प्रश्नाला दिलेल्या उत्तरावरून ते समाधानी दिसले नाही. त्यांनी टीकेला अधिक धार चढवत आपला मुद्दा आक्रमकपणे मांडणे सुरूच ठेवले.
कराडचे नवे अवतार कोण ?
सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले की, "लष्करी अळीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. 12 नोव्हेंबर 2024 रोजी प्रस्ताव पाठवला 37958 हेक्टरवरील भाताचे नुकसान झाले. अधिकारी म्हणाले की, आम्ही नुकसानीचे पंचनामे करायचे आदेश दिले नाही. नस्ती निपटारा कायद्यानुसार हे आदेश द्यायला हवे होते. नस्ती निपटारा कायद्याचा खून करणारे हे मंत्रालयातील वाल्मिक कराडचे नवे अवतार कोण आहेत ? GR नुसार याबाबतचा निर्णय कॅबिनेटमध्ये घेणे गरजेचा आहे, ते करावे. GR नुसार पंचनामा करणे गरजेचे होते, आता म्हणतायत की पंचनामे झाले नाही त्याला आम्ही काय करू ? "
अधिकाऱ्यांना दगड, माती खायला घाला
मुनगंटीवार पुढे म्हणाले की, पिकांचे मंडलनिहाय गेल्या वर्षीचे आणि या वर्षीचे पीक किती याचे चार्ट असतात. त्यानुसार पीक किती कमी झाले हे कळू शकते. पंचनामा न झाल्यास याचा आधार घेतला जाऊ शकतो. हेक्टरी 10 हजार रुपये नुकसान भरपाई मिळणार का ? जो अधिकारी निगेटीव्ह करतो त्याला यापुढे कधीही भात द्यायचा नाही त्याला माती,गोटे खायला घाला. लाखो रुपयांचा पगार घ्यायचा आणि शेतकऱ्यांच्या विरोधात अर्जाचा निपटारा करायचा नाही, अशा आधुनिक वाल्मिक कराड कोण हे शोधलं पाहीजे.
'चुकून' वरून एकच हशा पिकला
मुनगंटीवार यांनी तावातावाने बोलताना 'मी चुकून मंत्री झालो' असे विधान केले होते. यामुळे गडबड होऊ शकते याचा अंदाज आल्याने मंत्री आशिष शेलार तातडीने उठले आणि त्यांनी यावर खुलासा केला, शेलार यांनी म्हटले की, मुनगंटीवार हे चुकून मंत्री झाले नाही, ते मंत्रिमंडळाने ठरवून मंत्री होते, ते आमचे मंत्री होते याचा आम्हाला अभिमान आहे. यावर फिरकी घेत काँग्रेस आमदार नाना पटोले सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारला की, यंदा ते चुकून बाहेर राहिले का ? यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कोटी करत म्हटले की, मी चुकून ही चर्चा घडवून आणली असे वाटू देऊ नका. यानंतर सभागृहात एकच हशा पिकला होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world